
नागपूर मनपा निवडणूक पहिल्या टप्प्यात?
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुका होऊ घातलेल्या महापालिकेची संख्या बघता राज्य निवडणूक आयोग दोन टप्प्यात या निवडणुका घेणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक असलेल्या महापालिकांसह नागपूर महापालिकेचीही निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या महापालिकांत गणेशोत्सवानंतर निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह बृहन्ममुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिचवड, कल्याण डोंबिवली महापालिकेची अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. यात नवी मुंबई, वसई-विरारसह काही महापालिकांत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक आहे. निवडणूक आयोगाने नुकताच महापालिकेतील निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीतून महापालिकांच्या निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याचे संकेत मिळत असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नमुद केले. दोन वर्षांपासून प्रशासक असलेल्या महापालिकांसह नुकताच मुदत संपलेल्या काही महापालिकांच्या निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात इतर महापालिकांच्या निवडणूक होईल, असेही सुत्राने नमुद केले. औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२०मध्ये होणार होती. परंतु, करोना प्रादुर्भावामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता. तेव्हापासून येथे प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.
दोन टप्प्यात महापालिका निवडणूक झाल्यास पहिल्या टप्प्यात अर्थातच या महापालिकांचा तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूरचाही समावेश राहण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यात याव्या, अशी मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुका सप्टेंबरमध्ये निश्चित झाल्यास नागपूरचा समावेशही यात राहणार आहे. नागपूर महापालिकेच्या प्रशासकाचा सहा महिन्यांचा कालावधीही याच महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये नागपूर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यताही बळावली आहे.
२१ किंवा २३ मे रोजी महिला आरक्षण?
१७ मे रोजी प्रभागाचा अंतिम आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. महापालिकेने लोकसंख्येसह प्रभागाची रचना निवडणूक आयोगाला सादर केली. त्यामुळे अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षणही यातच जाहीर केले जाईल. प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी अर्थात २१ किंवा २३ मे रोजी प्रभागातील अनुसूचित जाती, जमाती आणि महिला आरक्षण काढण्यात येईल, असेही सुत्राने नमुद केले.
Web Title: Nagpur Muncipal Corporation Election Soon After Ganesh Chaturthi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..