नागपूर : मनपा निवडणूक लांबणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Municipal corporation elections postponed

नागपूर : मनपा निवडणूक लांबणार?

नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांतील गोंधळामुळे महानगर पालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदारांच्या नावांच्या अनुक्रमांत घोळ असल्याने राज्य निवडणूक आयोगाला १७ जूनला मतदार याद्या प्रसिद्ध करता आल्या नाहीत. आता या मतदार यांद्यामध्ये दुरुस्तीची कामे सुरू असून २३ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीची सर्वच प्रक्रिया लांबणार आहे. त्यामुळे जुन-जुलैला अपेक्षित मनपा निवडणुका गणपती विसर्जनानंतरच होण्याची शक्यता आहे.

नागपूरसह बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती महानगरपालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा १७ जून हा दिवस निवडणूक आयोगाने निश्चित केला होता. २ जूनला मतदार याद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार १७ जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या. परंतु राज्यभरातील महापालिकांनी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये दोष आढळून आला. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकत मागविणे, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

मनपा निवडणूक लांबणार?

करण्याच्या कार्यक्रमात बदल करावा लागला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २३ जूनला प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असे मनपातील एका अधिकाऱ्याने नमुद केले. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदीं संदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. परंतु महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय याद्या तयार करताना अनेक मतदारांचे अनुक्रमांक चुकल्याची बाब पुढे आली. त्यामुळे राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला.

अनेकजण अनभिज्ञ, मनपाचे दूर्लक्ष

जुन्या कार्यक्रमानुसार १७ जूनला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यामुळे १७ जूनला अनेक इच्छुक झोन कार्यालयांमध्ये मतदार यादी बघण्यासाठी गेले होते. परंतु त्यांची निराशा झाली. नव्या कार्यक्रमाबाबत महापालिकेने माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना उगाच झोन कार्यालयात फेरा मारावा लागला, असे माजी नगरसेवक ॲड. यशवंत मेश्राम यांनी सांगितले.

असा आहे बदल

जुना कार्यक्रम नवीन कार्यक्रम

मतदार यादी प्रसिद्ध - १७ जून - २३ जून

हरकती सूचना - २५ जून - १ जुलै

अंतिम मतदार यादी - ७ जुलै - ९ जुलै