
नागपूर : नद्यांचे १३ किलोमीटर पात्र स्वच्छ
नागपूर : पावसाळ्यातील पुरस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने शहरातील नदी व नाल्यांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली. पहिल्या टप्प्यात नाले सफाई करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात नद्या स्वच्छता मोहीम सुरू असून आतापर्यंत तिन्ही नद्यांच्या एकूण ४६.९२ किमी पात्रापैकी १३.६७ किमीचे पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नदी व नाले स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.
शहरातून वाहणाऱ्या नाग, पिली आणि पोहरा नदीचे स्वच्छता कार्य प्रगतीपथावर आहे. नाग नदी १७.४ किमी, पिली नदी १६.४ आणि पोहरा नदीचे पात्र १३.१२ किमी लांब आहे. तिनही नद्यांचे एकूण ४६.९२ किमी पात्र स्वच्छ करण्यात येत आहेत. आतापर्यंत १३.६७ किमी क्षेत्र स्वच्छ झाले असून या भागातून १७११६.८७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. नदी स्वच्छतेसाठी १२ पोकलेन मशिन कार्यरत आहेत.
नाग नदीअंतर्गत अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक, अशोक चौक ते सेंट झेव्हियर स्कूल, सेंट झेव्हियर स्कूल ते पारडी पूल, पारडी पूल ते नदीचे संगम पर्यंत नाग नदीची स्वच्छता सुरू आहे. पिली नदीचे गोरेवाडा ते मानकापूर घाट, मानकापूर घाट ते कामठी रोड पूल, कामठी रोड पूल ते जुने कामठी रोड पूल, जुने कामठी रोड पूल ते नदीचे संगम अशा टप्प्यात स्वच्छता कार्य केले जात आहे. पोहरा नदीची शंकरनगर ते नरेंद्रनगर, नरेंद्रनगर ते पिपळा फाटा, पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगाव अशा भागातून स्वच्छता केली जात आहे. नदी व नाले स्वच्छता अभियानातून दरवर्षी ०.८ - १.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येते.
यावर्षी नदी स्वच्छता अभियानांतर्गत नद्यांची रुंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्यासाठी सुरळीत प्रवाह करण्यात येणार आहे. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून संरक्षण होईल. नदी स्वच्छता अभियान प्रत्येक वर्षी लोक सहभागातून राबविण्यात येते.
Web Title: Nagpur Municipal Corporation Started Campaign To Clean Rivers 13km River Basin Clean
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..