
Nagpur News: महानगरपालिकेची निवडणूक हाेणार केव्हा?
Nagpur News : सध्या राजकीय वर्तुळात महापालिकेची निवडणूक केव्हा होणार? हाच सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. साधारणतः मे महिन्यात निवडणूक होणार, असा दावा केला जात आहे तर भाजपचे नेते मात्र विधानसभेच्या आधी निवडणूक होईल, असे वाटत नसल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे संभ्रम आणखी वाढला आहे.
नागपूरसह मुंबई व इतर मोठ्या महापालिकांचा कार्यकाळ संपला आहे. सुमारे एक वर्षापासून या महापालिकांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात प्रभागांची आणि सदस्यांच्या संख्यावाढीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. सोबतच आघाडीने केलेल्या नव्या प्रभाग रचनेलासुद्धा शिंदे सेना-भाजपने स्थगिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई महापालिकेत पराभवाच्या भीतीने सत्ताधारी निवडणूक लांबवत असल्याचा आरोप केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आरोप खोडून काढला.
ओबीस आरक्षण व इतर संबंधित प्रकरणे न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित असल्याने निवडणूक घेता येत नसल्याचा दावा केला आहे.
आता हा वाद वाढणार आहे. यात राज्यातील राजकीय सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केला.
यालाही उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही सर्व लांबलचक प्रक्रिया बघता लोकसभेच्या आधी महापालिकेची निवडणूक होणे नाही, हा भाजप नेत्यांचा दावा खरा वाटतो.
जिंकण्यासाठी आघाडी हाच पर्याय
सध्या महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढविण्याच्या मूडमध्ये आहे. कसबा जिंकल्यानंतर आघाडीला भाजपला पराभूत करण्याचा मंत्र सापडला.
कसबा, नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघ, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात आघाडीने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले.
आपले गड आणि नेते शाबूत ठेवायचे असल्याने विरोधकांना आघाडीशिवाय पर्याय दिसत नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका घेऊन भाजप आपल्या पायावर धोंडा मारून घेणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भाजपला कुठल्याही परिस्थिती मुंबई आणि नागपूर महापालिका जिंकायची आहे. मुंबई उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळू द्यायची नाही. नागपूर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे शहर असल्याने महापालिकेत सत्ता राखणे भाजपला आवश्यक आहे.