
नागपूर : शाळेत माध्यान्ह भोजनातून २९ विद्यार्थ्यांना विषबाधा
नागपूर - महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जामदार शाळेमधील २९ विद्यार्थ्यांना पाच दिवसांपूर्वी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. मात्र, अधिकाऱ्यांनी याची वाच्यता कुठेही न करता ते प्रकरण सपशेल दडपण्यावरच भर दिला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, याबाबत अद्याप शिक्षणाधिकाऱ्यासह पोषण आहार अधीक्षकांना पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल मिळाला नसल्याची माहिती आहे.
रेशीमबाग परिसरात जामदार हायस्कूल आहे. येथे निसर्ग महिला बचतगटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. २९ जुलैला विद्यार्थ्यांना चना दाळ आणि भात देण्यात आला. हा भात खाल्यावर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडाला सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांना दवाखान्यात नेण्यात आले. दरम्यान पोषण आहार विभागाने आहाराचे नमुने सीताबर्डी येथील प्रयोगशाळेत पाठविले. २९ तारखेची घटना असताना त्याबाबत अद्याप कुठलाही अहवाल आलेला नाही.
विशेष म्हणजे यावर्षी जून महिन्यात झालेल्या प्रक्रियेनंतर केंद्रीयकृत स्वयंपाकगृहातून आहाराचा पुरवठा करण्याचे कंत्राट निसर्ग महिला बचतगटाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १८ तारखेपासून बचतगटाच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, अगदी पंधरा दिवसांचा कालावधीही झाला नसताना बचतगटाने दिलेल्या पोषण आहारातून विषबाधा झाल्याने अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर आणि अधीक्षक गौतम गेडाम यांच्याकडून त्याबाबत कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येते. याबाबत अधीक्षक गौतम गेडाम यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच यासंदर्भात प्रीती मिश्रीकोटकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पाण्याचीही तपासणी
अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती असताना अधीक्षकांनी मानकापूर वॉटर स्टेशनकडे येथील पिण्याच्या पाण्याचीही तपासणी करण्याचे पत्र व्यवस्थापकांना दिले आहे. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाली असताना पाण्याला दोषी ठरवण्याचा प्रकार सुरू असल्याचे समजते.
खोटी माहिती दिल्याचा ठपका
पोषण आहारासाठी निविदेत निवडण्यात आलेल्या निसर्ग महिला बचतगटावर खोटी माहिती दिल्याचा ठपका आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वार्षिक अंकेक्षण अहवालवर सीएची स्वाक्षरी नाही. तसेच तीन लाखांची सरासरी नसताना ८ लाख १७ हजारांची उलाढाल केल्याची माहितीही त्यांनी सादर केली आहे.
Web Title: Nagpur Municipality Jamdar High School 29 Students Poisoned By Meal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..