
Nagpur News : रामटेक गडमंदिरावर पर्यटकांची गैरसोय
शितलवाडी : येथील गडमंदिरावर पर्यटक आणि यात्रेकरूंची गैरसोय होते. प्रसाधन गृह नसल्यामुळे पर्यटकांना उघड्यावर शौच करावा लागत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.
रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत श्रीराम गडमंदिर येथे कवी कालिदास स्मारक परिसरा समोरील पार्किंग लगत व श्री नरसिंह मंदिर परिसरालगत वेगवेगळ्या दोन स्थळी सार्वजनिक प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे प्रस्तावित करण्यात आले होते.
बांधकामाचे आदेश देऊन कामाची सुरुवात देखील करण्यात आली. परंतु मागील जवळपास चार वर्षापासून सार्वजनिक शौचालयाचे कामे रेंगाळलेले आहे. अद्यापही काही कामे पूर्ण करण्यात आली नाहीत. ही कामे कधी पूर्ण होतील, असा सवाल यात्रेकरूंनी केला आहे.
श्रीराम गडमंदिर येथे दर्शनाकरिता दररोज शेकडो यात्रेकरू महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून येतात. त्यांच्याकरिता नगरपरिषदे अंतर्गत दोन्ही स्थळी सार्वजनिक प्रसाधनगृह तयार केली आहे.
किमान गरजेपुरते तरी त्या स्थळी स्वच्छता नसल्याने ते यात्रेकरूंच्या उपयोगात येण्यासारखे नाही. याबाबत स्थानिक नगरपालिका प्रशासनास मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. हा प्रकार पर्यटक व यात्रेकरू यांच्या जिवावर बेतू शकतो.
सध्या गडमंदिर पर्वतावर वाघाचा वावर असल्याने वनविभाग काही स्थानिक लोकांना व गडमंदिर दुकानदारांना बघायला मिळाले. यामुळे उघड्यावर शौचालयाला जावे लागते. याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो.
अनेकदा सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येतात. त्यांच्यासोबत असलेल्या महिला भगिनींची होत असलेली गैरसोय अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. या प्रसाधनगृहाचे बांधकाम तातडीने कधी पूर्ण होणार, असा सवाल पर्यटकांनी केला आहे.
शौचालयात पाणी ठेवणे आवश्यक आहे. पण या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.नवीन शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून बांधकाम विभागाकडून हस्तांतरण झाल्यावर लवकर सुरू होतील.
-सुमीत कोठारी, माजी विरोधी पक्षनेते न.प. रामटेक
गडमंदिर परिसरातील शौचालयाबाबत माझ्याकडे कुठलेही तक्रार आलेली नाही. नगर परिषदेकडून स्वच्छतेबाबत, पाण्याबाबत आणि कुठल्याही व्यवस्थेबाबत तत्काळ चौकशी करणार आहे.
-मंगेश वासेकर, मुख्याधिकारी न.प.रामटेक
नगरपरिषदेमध्ये सत्तेत असताना शौचालयात ड्रम ठेऊन पाण्याची व्यवस्था व स्वच्छतेकडे लक्ष देत होतो. आता नगर प्रशासन व मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. दर दोन दिवसांनी पाणी व स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करायला पाहिजे. सध्या यात्रेकरू आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
-दिलीप देशमुख, माजी अध्यक्ष न.प. रामटेक