
World Environment Day : दीडशे वर्षे जुन्या झाडाचा आज साजरा होणार वाढदिवस
नागपूर : मागील वर्षी मे महिन्यात वादळामुळे गोरेवाडा येथे दीडशे वर्षांचे वडाचे झाड उन्मळून पडले होते. मनपा उद्यान विभागाने या झाडाचे त्याच परिसरात प्रत्यारोपण करून त्याला जीवदान दिले. आज हे झाड चांगलेच बहरले असून महापालिकेचा उद्यान विभाग सोमवारी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त या झाडाचा वाढदिवस साजरा करून नागरिकांना झाडे जगवा, झाडे लावण्याचा संदेश देणार आहे.
मागील वर्षी २४ मे रोजी शहरात मोठे वादळ आले होते. या वादळात गोरेवाडा येथे दीडशे वर्षे जुने वडाचे झाड कोसळल्याने परिसरातील नागरिकांनीही दुःख व्यक्त केले होते. महापालिकेच्या उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार यांनी २६ मेपासून १७ फूट एवढा रुंद असलेल्या झाडांच्या प्रत्यारोपणाची तयारी सुरू केली. दीडशे वर्षे जुन्या झाडाचे प्रत्यारोपणाचे आव्हान मोठे होते. परंतु गेली अनेक वर्षे उद्यान विभागात राहून झाडांप्रती संवेदना असलेले कर्मचारी प्रेमचंद तिमाने यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर प्रत्यारोपणाची कसरत सुरू झाली. मागील वर्षीच्या प्रत्यारोपणाच्या आठवणींना उजाळा देत तिमाने म्हणाले, पडलेल्या झाडांच्या फांद्या
दीडशे वर्षे जुन्या झाडाचा आज साजरा होणार वाढदिवस
छाटण्यात आले. मुळापासून वर २० फूट एवढीच झाडाची उंची ठेवण्यात आली. झाडाचे प्रत्यारोपण करण्यासाठी २५ फूट''रुंद व १२ फूट खोल खड्डा खोदण्यात आला. परंतु झाड मोठे असल्याने खड्ड्यामध्ये कसे उभे करावे, हे मोठे आव्हान होते. यासाठी शहरात मोठी क्रेन उपलब्ध नव्हती. क्रेन शोधल्यानंतर झाडाच्या प्रत्यारोपणाचा दिवस ठरला. परंतु क्रेनची गरज पडण्यापूर्वीच फांद्या कापल्या असल्याने झाडाचा तोल प्रत्यारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्याकडे झुकला अन् खड्ड्यात आपोआप उभे झाले, हा योगायोगही अनुभवास आल्याचे तिमाने यांनी नमूद केले. या घटनेस उद्या एक वर्ष पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षभरापासून या झाडाची निगा राखत असून आता हिरवे झाले आहे.
असे दिले जीवदान
झाडाच्या यशस्वी प्रत्यारोपणासाठी खड्ड्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही. एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसित करण्यासाठी औषधोपचार करण्यात आले. झाडाच्या आजूबाजूला टाकण्यात आलेल्या चार पाईपद्वारे झाडाला पाणी व वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा करण्यात आला. आज वर्षभरानंतर झाड हिरवेगार असून सावली देत आहे.
उन्मळून पडलेल्या झाडाला नवजीवन देण्यासाठी मनपाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या काम केले. या सर्वांच्या कार्यामुळे झाडाला जीवनदान देता आले. या कर्मचाऱ्यांचे या झाडावर विशेष प्रेम असून उद्या वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली आहे.
— अमोल चौरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका