
Nagpur : नागपूरची अवयवदानाचे हब बनण्याच्या दिशेने वाटचाल
नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात ते काही खोटे नाही. मृत्यूनंतरही अवयवदानाच्या रूपात अनेक जण आजही जिवंत आहेत. उपराजधानीत दशकापूर्वी अवयवदान प्रत्यारोपणाची सुरुवात झाली.
अल्पावधीत अवयवदानाला चळवळीचे रूप प्राप्त झाले. १० वर्षांत १०० मेंदूमृतांचे अवयवदान झाले. या अवयवदानातून २४६ जणांना जीवनदान मिळाल्याची क्रांती उपराजधानीत झाली. तर ५४ जणांच्या नेत्रदानातून १०८ जणांच्या डोळ्यांत उजेड पेरला. यकृत, किडनी आणि हृदयाच्या प्रत्यारोपणातून नागपूरची अवयवदानाचे हब बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
उपराजधानीत २०१३ साली समितीमार्फत डॉ. बी.जी. वाघमारे यांच्या मार्ददर्शनात पहिले अवयवदान झाले. त्यानंतर सातत्याने अवयवदान होत आहेत. बुधवारी (ता.८) १०० व्या मेंदूमृताचे अवयवदान झाले.
अवयवाचे दान मिळेल प्रतीक्षेत आयुष्य जगत असलेल्या २४६ जणांना जीवनदान मिळाले. यात १७६ जणांना किडनी तर ६९ व्यक्तींना यकृत प्रत्यारोपणातून जीवनदान मिळाले. अवयवदानाची चळवळ गतीशील करण्यासाठी अवयवांचे महत्त्व सांगत मृत्यूनंतर अवयवांचे दान करा,
असा संदेश देणारे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या माजी अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, माजी सचिव डॉ. रवी वानखेडे, विद्यमान अध्यक्ष डॉ. संजय कोलते, विद्यमान सचिव डॉ. राहुल सक्सेना यांचे मोलाचे योगदान आहे. विशेष असे की, विभागीय अवयवदान समितीमार्फत ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर अर्थात समन्वयक पदावर कार्यरत वीणा वाठोरे अवयनदानाची प्रतीक्षा यादी तपासण्यापासून तर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी सांभाळतात.
त्वचादान अल्पच
उपराजधानीत किडनी, यकृत, नेत्रदानाचा टक्का वाढला असताना त्वचादानाबाबत समाजात जागृती नसल्याने त्वचादानाबाबत आजही समाजात गैरसमज आहेत. आतापर्यंत केवळ ८ जणांचे त्वचादान झाले. तर मेंदूमृतांकडून ५४ जणांचे नेत्रदान झाले असून यातून १०८ जणांच्या डोळ्यांमध्ये उजेड पेरण्यात आला.
असे झाले मेंदूमृत
वर्ष मेंदूमृत
-२०१३ - -१
-२०१४ - -५
-२०१५ - -७
-२०१६ - -१२
-२०१७ - -२४
-२०१८ - -३३
-२०१९ - -२८
-२०२० - - ६
-२०२१ - -३१
-२०२२ - -२०
-२०२३ - -८
असे झाले अवयवदान
-किडनी -१७६
-यकृत - ६९
-हृदय - १
-त्वचा - ८
-नेत्र - ५४
नागपुरातून झेपावले १४ हृदय, १४ यकृत
दिल्लीतील एम्स, चेन्नई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद आणि मुंबईमध्ये हृदयाची गरज असलेल्या १४ जणांना हृदयदानाचे पुण्यकर्म नागपुरातून झाले. तसेच यकृताच्या प्रतीक्षेत आयुष्य जगत असलेल्या १४ जणांना जीवनदान देण्यासाठी उपराजधानीतून यकृत दान करण्यात आले. ३ किडनी बाहेर पाठवून त्यांचे जीव वाचविण्यासाठी विभागीय अवयवदान समितीने पुढाकार घेतला. फुप्फुसासह आता हृदय बाहेरून आले होते.
ते यशस्वी नागपुरात प्रत्यारोपित करण्यात आले. कायद्याची बंधने पाळत विभागीय अवयवदान समितीच्या पुढाकारातून हे सत्कर्म झाले.
मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळू शकते, ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. अवयवदानाच्या या चळवळीत काम करण्याची संधी मिळत आहे याचे समाधान आहे.
-वीणा वाठोरे, समन्वयक, विभागीय अवयवदान समिती, नागपूर
नागपुरातून झेपावले १४ हृदय, १४ यकृत
दिल्लीतील एम्स, चेन्नई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद आणि मुंबईमध्ये हृदयाची गरज असलेल्या १४ जणांना हृदयदानाचे पुण्यकर्म नागपुरातून झाले. तसेच यकृताच्या प्रतीक्षेत आयुष्य जगत असलेल्या १४ जणांना जीवनदान देण्यासाठी उपराजधानीतून यकृत दान करण्यात आले.
३ किडनी बाहेर पाठवून त्यांचे जीव वाचविण्यासाठी विभागीय अवयवदान समितीने पुढाकार घेतला. फुप्फुसासह आता हृदय बाहेरून आले होते. ते यशस्वी नागपुरात प्रत्यारोपित करण्यात आले. कायद्याची बंधने पाळत विभागीय अवयवदान समितीच्या पुढाकारातून हे सत्कर्म झाले.
मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळू शकते, ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. अवयवदानाच्या या चळवळीत काम करण्याची संधी मिळत आहे याचे समाधान आहे.
-वीणा वाठोरे, समन्वयक, विभागीय अवयवदान समिती, नागपूर