
Nagpur : पांढराबोडी तलावाचे अस्तित्व धोक्यात; ऐतिहासिक वारशाकडे मनपाचे दुर्लक्ष
पांढराबोडी : एकीकडे सोनेगाव, सक्करदरा व गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम वेगाने सुरू असताना, पश्चिम नागपुरातील ऐतिहासिक पांढराबोडी तलाव मात्र दुर्लक्षित ठरत आहे. एकेकाळी २७.१० एकर परिसरात पसरलेला हा प्रशस्त तलाव आता आपल्या उरल्यासुरल्या ६.२० एकरचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी संघर्ष करीत आहे.
तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी महानगरपालिकेने काही केले नाही असे नाही. पालिकेने सहा वर्षांपूर्वी निविदा काढून कामही सुरू केले. परंतु, स्थानिकांनी सौंदर्यीकरणाचे साहित्य चोरल्याने कंत्राटदाराने काम अर्ध्यावर सोडून पळ काढला. त्यानंतर आतापर्यंत तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
आपल्या अस्तित्वासाठी हा तलाव कोर्टातसुद्धा लढा देत आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एक चतुर्थांशपेक्षा कमी राहिलेला हा ऐतिहासिक वारसा इतिहासजमा होतो की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. प्रशासनाच्या अशाच बेफिकीरीमुळे यापूर्वी अतिक्रमणाच्या कचाट्यात येऊन नागपुरातील जवळपास १२ ते १५ तलाव नष्ट झाले आहेत.
तलावाची झालेली दुर्दशा येथील स्थानिक बाजीप्रभू नागरिक मंडळाला खटकली. तलावाचा विकास व्हावा म्हणून २०१८ मध्ये या संस्थेद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावेळी महानगरपालिकेने उत्तर देताना म्हटले होते की, तलावाचे आतापर्यंत ९९ टक्के काम पूर्ण असून,
यासाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा खर्च झाला. परंतु ही माहिती केवळ तोंडी पद्धतीने सांगितल्याने न्यायालयाने ती मान्य केली नव्हती आणि पालिकेला शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आजही वास्तवात या तलावाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. कोट्यवधी रुपयांचा केलेला खर्च तलाव परिसरात गेल्यावर दिसून येत नाही. त्यामुळे त्या पैशांचे काय झाले? हा प्रश्न निर्माण होतो.
तलावाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने जे काम केले, ते आता स्थानिक नागरिकांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. पालिकेने तलाव तर शुद्ध केला. मात्र, तलावातून निघालेला कचरा आजही काठावर पडून आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एवढेच नाही सौंदर्यीकरणाच्या कामामुळे नाल्या चोक झाल्या आहेत. पावसाच्या दिवसांत येथे घरात शिरेपर्यंत पाणी साचते, असे विक्की पिसावर या स्थानिक रहिवाशाने सांगितले. पूर्वी आजूबाजूच्या वस्तीतील गडरलाइनमुळे येथे तलावात सांडपाण्याचा निचरा होत होता. मात्र, काम करताना गडरसुद्धा बुजले. ज्यामुळे वारंवार गडरलाइन चोक होण्याची समस्या येथे वाढली आहे.
सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पांढराबोडीत ठिकठिकाणी डबके साचलेले दिसतात. तसेच डुकरांचा वावर येथे वाढला आहे. साचलेल्या पाण्यात मच्छरांचा प्रादूर्भाव वाढल्याने मलेरियासारख्या रोगांचा धोका येथे आहे. तसेच लोकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत. याशिवाय तलावाभोवती अर्धवट तयार झालेली भिंत जुगार खेळणाऱ्यांसाठी हक्काचा ठिय्या झाला आहे. परिसरात मद्यपींंचा वावर असतो.
पांढराबोडी तलावानजीकचा हा परिसर दुर्लक्षित असल्याने येथील नागरिकांमध्ये महानगरपालिकेबाबत तीव्र नाराजी आहे. ४ कोटी रुपयांची केलेली कामे नियोजनाच्या अभावामुळे मातीमोल ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महानगरपालिकेने पैसे सौंदर्यीकरणासाठी वापरले, की परिसराचा धिंगाणा मांडण्यासाठी उपयोग केला? हा प्रश्न येथील नाकरिक संतापून विचारत आहेत.