नागपूर : भाडेवाढीने प्रवाशांमध्ये संताप

वाहकांसोबत वादावादी : सामान्याची लूट चालविल्याचा आरोप
Nagpur travelling ticket rates hike
Nagpur travelling ticket rates hikesakal

नागपूर : सामान्यांसाठी परवडणारे वाहन म्हणजे आपली बस. शहराच्या कुठल्याही टोकापर्यंत प्रवासासाठी सोईस्कर असलेल्या आपली बसच्या भाड्यात तब्बल १७ टक्के वाढ झाली. ऑटोचालकांनीही भाड्यात वाढ केली. महागाईमुळे आधीच बेजार झाल्यानंतर आता शहरातील प्रवासासाठीही भरमसाठ रक्कम मोजावी लागत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून दररोज बसमध्ये वाहक आणि प्रवासी यांच्यात तिकिटाच्या पैशावरून वाद होत आहेत. भाडेवाढ करून लूट चालविल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहेत.

इंधन दरवाढीसोबतच खाद्यान्नाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे खिशाला परवडणारे नसल्याने अनेकजण ‘आपली बस''कडे वळले. मात्र, शहराची जीवनवाहिनी असलेल्या ‘आपली बस’ने भाडेवाढ केली. नियमित प्रवास करणारे प्रवासी, वृद्धांसह इतर नागरिकांना सुद्धा ही भाववाढ पचनी पडलेली नाही. वाढलेल्या दरवाढीमुळे वाहकासोबत प्रवाशांचे वाद वाढले आहेत. आधीच महागाईने होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना ही भाववाढ कंबरडे मोडणारी ठरु लागली आहे.

रविवार तसा सुटीचा दिवस. नोकरी करणारे नियमित प्रवासी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी या दिवशी नसते. तरी सुद्धा वर्धा मार्गावरून जाणारी ‘आपली बस’ गर्दीने ‘हाऊसफुल’ होती. दुपारी चार वाजताची वेळ. सीताबर्डी-बुटीबोरी- टाकळघाट या बसमध्ये चांगलीच गर्दी होती. प्रवासी उभे राहून प्रवास करीत होते. वाहक प्रत्येकाकडे जाऊन ‘ईटीआयएम’मशीनद्वारे तिकीट काढीत होता. एका सामान्य व सुशिक्षित प्रवाशाच्या हातात तिकीट देताच ‘एवढे पैसे कसे काय?’ असा प्रश्न वाहकावर फेकला. बस कंपनीने वाढ केल्याचे सांगताच तो प्रवासी रागाने एकदमच उसळला. दोघांत काही क्षण वादही झाला. पण नाइलाज असल्याने चरफडत बसण्यापेक्षा

प्रवासी काही करू शकला नाही. अचानक झालेल्या भाडेवाढीने त्याची नाराजी उघडपणे दिसत होती. त्यानंतर वाहक इतरही प्रवाशांकडे गेला. भाडेवाढ झाल्याचे बसमध्ये समजताच प्रवासी संतप्त होत होते. सध्या वाहकाला प्रवाशांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती इंडोरामा-बर्डी या बसमध्ये सुद्धा पाहायला मिळाली.

‘आपली बस’ने नोकरीवर जाणाऱ्या महिला-पुरुषांची संख्या शहरात फार जास्त आहे. त्यासोबतच शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. भाडे कमी व परवडणारे असल्याने सामान्य कुटुंबातील लोकं आपली बसचा लाभ घेतात.

प्रवासी इतरत्र वळण्याची शक्यता

पैसे वाचावेत म्हणून गरीब विद्यार्थी सुद्धा पास बनवून शाळा, महाविद्यालयात पोहोचतात. तर हल्ली पेट्रोल महाग झाल्याने बरेच नागरिक या सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेऊ लागले आहे. आता परवडणाऱ्या आपली बसने केलेले भाडेवाढ नागरिकांना पसंत पडलेली नाही. त्यामुळे आपली बसकडे वळलेले शहरातील नागरिक परत आपल्या खासगी वाहनाकडे जाऊ शकतात. याचा फटकाही येणाऱ्या काळात ‘आपली बस’बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com