नागपूर : पावसाची दडी, जलसाठा घटतोय!

शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणामाची शक्यता
Nagpur
Nagpursakal

नागपूर : यंदा जून महिना कोरडाच गेला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने पाणीपुरवठ्याबाबत चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयात घट झाली आहे. मागील वर्षी जूनमध्ये तोतलाडोह जलाशयातील स्थितीची तुलना केल्यास पाणीसाठा जास्तच कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. पावसाने जुलैमध्येही दडी मारल्यास नागपूरकरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणामाची शक्यता नाकारता येत नाही.

मागील वर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला होता. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठे पूर्ण भरले नसले तरी समाधानकारक भर पडली होती. यंदा जून महिन्यातील दोन, तीन दिवस वगळता जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. दररोज आकाशात ढग जमा होत असले तरी पावसाने मात्र, हुलकावणी दिली. त्यामुळे आज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलसाठ्यात ५१.३७ टक्के पाणी आहे.

मागील महिन्यात या जलसाठ्यात ५६.३५ टक्के पाणी होते. परंतु संपूर्ण जून महिन्यांत नागरिक उन्हाळ्याचीच अनुभूती घेत असल्याने पाण्याचा वापर मे महिन्याप्रमाणेच सुरू आहे. परिणामी तोतलाडोह येथील जलसाठ्यात पाच टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी याच दिवशी जूनमधील पाण्यासाठ्याचा विचार केल्यास ही घट नऊ टक्क्यांची आहे. जून महिन्याप्रमाणेच जुलैही कोरडा गेल्यास नागपूरकरांच्या पाणीपुरवठ्यात थेट नाही, परंतु अप्रत्यक्ष

पावसाची दडी, जलसाठा घटतोय!

परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेकदा महापालिका, ओसीडब्लू कुठले तरी काम काढून पाणी कपात करीत असते. त्यामुळे जुलैमध्येही अशी कामे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी जलाशय तूर्तास ६५ टक्के भरले आहे. मागील महिन्यात आजच्या दिवशी ४७.१४ टक्के पाणी होते. मागील महिन्याच्या तुलनेत पाणी अधिक आहे. परंतु नवेगाव खैरी जलाशयात तोतलाडोह जलाशयातून पाणी पुरविले जाते. नवेगाव खैरीतून शहराला पाणी मिळते. त्यामुळे पुढील काही दिवस नवेगाव खैरी जलाशयातून पाण्याचा उपसा होईल. परंतु पाऊस न आल्यास हा पाणीसाठाही कमी होणार आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीसाठ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com