
‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’मध्ये स्त्रीशक्तीचा गौरव
नागपूर : आपल्या अफाट कर्तृत्वाने यशाची नवनवीन शिखरे लीलया सर करणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान होताना अवघे सभागृह भारावून गेले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात नागपूर विभागातील २७ कर्तृत्वान महिलांना ‘विमेन इन्फ्लूअन्सर्स’ सन्मान बहाल करण्यात आला. शनिवारी हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ या देखण्या कार्यक्रमाची नागपूर नगरीवर अमीट छाप उमटली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, नागपूरकर अभिनेत्री शिवांगी देवरस, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा थाटात पार पडला.
महिलांसाठी दीपस्तंभ म्हणून उभे राहा
आयुष्यात अनेक संकटांवर मात करीत, समोर येणाऱ्या वादळात आपले पाय घट्ट रोवून तुम्ही प्रगती साधली. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही एक दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून उभे राहा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केले. त्या म्हणाल्या की, ‘सकाळ’ने नऊ दशकांपासून ती परंपरा जपली आहे. आपल्या विविध सामाजिक कार्यक्रमांतून त्यांनी समाजाच्या हितासाठी काम केले आहे. त्यामुळे हा सेवेचा सन्मान सोहळा आहे.
शेतकऱ्यांसाठी असलेले जगातील पहिले दैनिक ‘ॲग्रोवन’बाबतही त्यांनी गौरवोद्गार काढले. जलयुक्त शिवार, तनिष्का, सकाळ रिलिफ फंड आणि विविध सामाजिक उपक्रमांतून ‘सकाळ’ने समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले. आजचा सोहळा हा केवळ सन्मान सोहळा नसून, भावनिक सोहळाही असल्याचे दिसून येते. आपल्या घरातील कर्तृत्ववान महिलेचा सन्मान बघण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले आहे. ही दुर्मिळ बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी साथ दिली म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात आजही व्रतवैकल्यांच्या नावावर आमच्या महिलांवर अत्याचार होत आहेत. वटपोर्णिमेच्या दिवशी अनेक महिला वडाला धागेदोरे बांधताना दिसून येतात. यामध्ये आदल्या दिवशी पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या महिलाही मला दिसून आल्यात. त्यांना विचारणा केली असता, त्या समाज, सासू-सासरे काय म्हणतील, असे सांगतात.
- रूपालीताई चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
Web Title: Nagpur Sakal Idols Of Maharashtra Women Influencers Award
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..