नागपूर : सुरक्षा ठेव घोटाळा, दोषी कर्मचाऱ्यांकडून अद्याप वसुली नाही!

सहा महिन्यांचा काळ होत असताना अद्याप ही रक्कम दोषींकडून वसूल करण्यात आली नाही
Nagpur Zilla parishad
Nagpur Zilla parishadsakal

नागपूर : सुरक्षा ठेव घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदचे ७९ लाखांचे नुकसान झाले असून ही रक्कम दोषी कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी दिले होते. सहा महिन्यांचा काळ होत असताना अद्याप ही रक्कम दोषींकडून वसूल करण्यात आली नाही. विभाग प्रमुखांकडून या प्रकरणावर पांघरून घालून दोषींना पाठीशी घालण्यात येत असल्याचे दिसते.

जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव घोटाळा समोर आला. या प्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा, लघु सिंचन व बांधकाम विभागाकडून सदर पोलिस ठाण्यात १५ वर कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणात १२ कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेचे ७९ लाखांचे नुकसान झाले असून ही रक्कम दोषी कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. कर्मचाऱ्याकडून किती रक्कम वसूल करायची आहे, हे विभाग प्रमुखांनी निश्चित करायचे होते. परंतु, सहा महिन्याचा कालावधी होत असताना अद्याप विभाग प्रमुखांनी या प्रकरणी कोणतेही पावले उचलली नाहीत.

काही कर्मचारी विभागातच

सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले अनेक कर्मचारी संबंधित विभागात आणि मुख्यालयातच कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन प्रभारी कार्यकारी अधिकारी यांच्या भूमिकेवर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. पदाधिकारी व सत्ताधारी सदस्यांनी त्याची तक्रार केली आहे. त्यानंतरही विभागातच असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सीईओ विभाग प्रमुखांवर कारवाई करणार?

कामात हयगय व आदेशाची अंमलबजावणी न केल्या प्रकरणी सीईओ कुंभेजकर यांनी आतापर्यंत २०० वर कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत त्यांची वेतनवाढ रोखली आहे. परंतु, गैरव्यवहार सारख्या गंभीर प्रकरणाबाबत आदेशाची अंमलबाजणी होत नाही. त्यामुळे सीईओ विभाग प्रमुखांवर कारवाई करणार का? असाच सवाल सर्वसामान्य कर्मचारी करीत आहे. सीईओंचा जोर फक्त लहान कर्मचाऱ्यांवर असून बड्यांना सोडत असल्याने अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com