
Congress : अधिवेशनापूर्वीच काँग्रेसमध्ये मोठे बदल? नाना पटोले यांच्या विरोधात मोहीम
Nana Patole News: अखिल भारती काँग्रेस कमिटीचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे २४ ते २६ फेब्रुवारीला आयोजित केले आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नाही असे कळविले. तसेच विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी पटोले यांच्या विरोधात मोहीम उघडली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
बैठकीसाठी सर्व राज्यातील आणि शहरातील प्रदेश प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच सर्व प्रतिनिधींची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
अ. भा. काँग्रेस कमिटीने सर्व प्रदेश प्रतिनिधींना वार्षिक शुल्क हजार रुपये, पक्षनिधी चारशे आणि काँग्रेस संदेशचे तीनशे असे प्रत्येकाला सतराशे रुपये भरण्यास सांगितले आहे. नामनियुक्त सदस्यांची सदस्य फी तीन हजार रुपये असून, त्यांना एकूण चार हजार तीनशे रुपये भरायचे आहेत.
‘हात से हात जोडो’वर चर्चा
राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून सर्व सदस्यांनी सदस्य शुल्क १५ फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यालयात भरण्याचे आदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी काढले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यानंतर जिल्हानिहाय सुरू करण्यात आलेले ‘हात से हात जोडो’ अभियान यावर काँग्रेसच्या अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे समजते.