
Nagpur : शिवाजी विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद
नागपूर : तमिळनाडू शारीरिक शिक्षण विद्यापीठाच्या यजमानपदाखाली चेन्नई येथे झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने ९१ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
शेवटच्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या रेश्मा केवटेने महिलांच्या अर्ध मॅरेथॉन, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुभम भंडारेने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले.
साताऱ्याची असलेल्या आणि गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या ‘सकाळ’ च्या अर्ध मॅरेथॉन शर्यतीत प्रथम स्थान मिळविणाऱ्या रेश्माने १ तास १८ मिनिटे १४ सेकंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या शर्यतीत शिवाजी विद्यापीठाच्या विवेक मोरेने रौप्यपदक जिंकताना १ तास ७ मिनिटे २४ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. त्याने दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.
पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत ओंकार कुंभारला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १ मिनीट ५०.१० सेकंद अशी वेळ दिली. महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत रोहिणी पाटीलनेही ब्राँझपदक जिंकले. तिने २ मिनिटे ०७.८९ सेकंद अशी वेळ दिली.
पंधराशे मीटर शर्यतीत तिला पाचवे स्थान मिळाले. प्राजक्ता शिंदेने दहा हजार मीटर शर्यतीत रौप्य व पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. महिलांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत अनुष्का कुंभारला रौप्यपदक मिळाले.
सुदेष्णा वेगवान धावपटू
साताऱ्याची असलेल्या सुदेष्णा शिवणकरने महिलांची शंभर मीटर शर्यत जिंकून स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब जिंकला. आपल्या दुसऱ्या अखिल भारतीय स्पर्धेत सहभागी होताना तिने ११.७७ सेकंद अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ दिली.
दोनशे मीटरमध्ये तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत वेगवान महिला धावपटूचा किताब साताऱ्याच्या खेळाडूने जिंकण्याची सहा वर्षांतील ही दुसरी वेळ होय. यापूर्वी २०१७ मध्ये गुंटूर येथे चैत्राली गुजर हिने हा किताब मिळविला होता.
शुभमचा स्पर्धा विक्रम
पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुभम भंडारेने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
त्याने ८ मिनिटे ४७.३३ सेकंद अशी वेळ देताना लोकेश चौधरीने गेल्या वर्षी नोंदविलेला ८ मिनिटे ५१.३३ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. यात शिवाजी विद्यापीठाच्या सुशांत जेधेने ८ मिनिटे ४९.३४ सेकंदांत ब्राँझपदक जिंकले. पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रणव गुरवने १०.७१ सेकंदासह सुवर्णपदक आपल्या नावे केले.
नागपूरच्या प्राजक्ताला रौप्यपदक
महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेने १ तास १८ मिनिटे ४३ सेकंदांत शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सौरव तिवारीला आठवे, तर रोहित झा याला दहावे स्थान मिळाले. महिलांच्या स्टीपलचेस शर्यतीत रिया दोहतरेने सातवे स्थान प्राप्त केले. हे सर्व खेळाडू खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरले.