Nagpur : नागपूरकरांनी अनुभवला थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : नागपूरकरांनी अनुभवला थरार

नागपूर : स्कायडायव्हिंग, आकाशगंगा टीमचे सादरीकरण आणि एअरो मॉडलिंग शो तसेच सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या चित्तथरारक कवायतींमुळे शनिवारी नागपूरकरांचे लक्ष दोन तास आकाशाकडे लागले होते. विमानांच्या कवायतींचा हा थरार अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून स्मृती जपून ठेवल्या तर काहींनी देहभान विसरून आनंद लुटला. या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिक थक्क झाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय वायुदलाच्या वतीने वायुसेनानगर येथील मेन्टेनंस कमांडच्या परेड मैदानावर शनिवारी सकाळी आयोजित एअरफेस्टसाठी नागपूरकरांची गर्दी उसळली. परंतु हा एअर शो निमंत्रितांसाठीच असल्याने अऩेकांची निराशाही झाली. परंतु ज्यांनी एअर शो बघितला, त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. शो बघण्यासाठी सकाळपासूनच निमंत्रितांची पाऊले परेड मैदानाकडे वळली. सारंग एरोबॅटिक हेलिकॉप्टरच्या हवाई कवायती तर डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंगने चिमुकल्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. १४-एनसीसी एअर विंग कॅडेट्सच्या एअरो मॉडेलिंग शोने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

आकाशगंगा’चे तीन सदस्य तिरंगा घेऊन खाली उतरले अन् उपस्थितांमध्ये जाज्वल्य देशभक्तीचा हुंकार चेतविला. एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण होते. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानांच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकले. ‘आकाशगंग’ या पथकाच्या १० याेद्धे ८ हजार फूट उंचावर या चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता. याशिवाय पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँड सादरीकरणाने मने जिकंली.

टॅग्स :NagpurNagpur News