Nagpur : श्री एम यांच्या प्रवचनासाठी ऑस्ट्रेलियातूनही येणार सद्‌भक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guru Padmambhushan Sri M

Nagpur : श्री एम यांच्या प्रवचनासाठी ऑस्ट्रेलियातूनही येणार सद्‌भक्त

नागपूर : जगविख्यात अाध्यात्मिक योगगुरू पद्मभूषण श्री एम यांच्या सत्संग प्रवचनासाठी ऑस्ट्रेलिया देशातून नोंदणी करण्यात आली आहे. केवळ विदर्भातूनच नव्हे तर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून आणि देशातील अनेक राज्यांतूनही प्रवचनासाठी सद्भक्त नागपूरमध्ये दाखल होणार आहेत.

तेजपुंज दिव्यमूर्ती आणि अमोघ अमृत वाणी यामुळे जगभरात श्री एम यांचा चाहता वर्ग निर्माण झाला. `सकाळ माध्यम समूह` आणि `सत्संग फाउंडेन`च्या वतीने येत्या शनिवारी १७ डिसेंबर रोजी नागपूर येथे परम सत्संग प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक सद्‍भाव, एकता, सौहार्द या मूल्यांची शिकवण श्री एम देतात. अखिल मानवतेला ही शिकवण देण्यासाठी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा आणि जगभर भ्रमंती केली. त्यांच्या विचारधनामुळे मानवी हृदयात सकारात्मक परिवर्तन होते.

जीवनाकडे बघण्याची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. हिमालयात कठोर तपश्चर्या करून श्री एम यांनी `आध्यात्मिक सिद्धी` प्राप्त केली आहे. नागपूर येथे होणाऱ्या या अध्यात्मिक महाकुंभातील अमृत प्रकाशात न्हाऊन निघण्यासाठी सद्भक्त आतूर झाले आहेत. श्री एम यांच्या आगमनाची उत्कंठा सर्वांनाच असल्यामुळे आधीच आपली जागा आरक्षित करून श्री एम यांच्या अद्भूत सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन `सकाळ माध्यम समूह` आणि `सत्संग फाउंडेशन`च्या वतीने करण्यात आले आहे.

श्री एम यांची योगगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही जगभर ख्याती आहे. आध्यात्मिक गुरू होण्याचा त्यांचा प्रवास अद्‍भूत आहे. केरळमध्ये एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना गुरूदर्शन झाले. त्यानंतर आध्यात्मिक ओढीने वयाच्या १९ व्या वर्षी ते एकटेच हिमालयात निघून गेले. बद्रीनाथजवळील एका प्राचीन गुहेत त्यांना त्याच गुरूंचे दर्शन झाले. असे म्हणतात की, त्यांच्यासोबत यापूर्वी झालेल्या पहिल्या भेटीचे स्मरणही त्यांना येथे झाले. त्यांच्या सान्निध्यात श्री एम यांनी कठोर ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली. तीन वर्षांच्या काळानंतर त्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली. यादरम्यान आणि पुढे त्यांनी अनेक संत-महंतांसोबत भेटी घेत ज्ञानपूर्तता केली.

तिबेटमध्येही ते फिरून आले. गुरूंच्या आदेशानंतर त्यांनी आपले जीवन लोकोन्नतीसाठी मिशन म्हणून व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे त्यांनी रामकृष्ण मिशन आणि कृष्णमूर्ती फाउंडेशनमध्ये व्यतीत केले. पुढे त्यांनी प्रवचन देणे सुरू केले. १७ डिसेंबर रोजी आयोजित या अध्यात्मिक पर्वणीचे साक्षीदार व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे .