
नागपूर : एसटीत सेवानिवृत्तांच्या सेवेला अल्पप्रतिसाद
नागपूर : एसटीचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संप मिटण्याची चित्रे दिसत नसल्याने सेवानिवृत्त चालकांना मानधन तत्त्वावर बोलावून त्यांची सेवा घेण्याचा विचार पुढे आला. नागपूर विभागातील प्रशासनाने अलीकडे निवृत्त झालेल्या १३५ कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. यातून १० सेवानिवृत चालकांनी अर्ज केला असून यापैकी केवळ १ कर्मचारी सध्या कार्यरत आहे.
हेही वाचा: २०२३ मध्ये जीडीपी ८ ते ८.५ टक्के राहील - अर्थमंत्री सितारामन
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे व्रत घेणाऱ्या एसटी प्रशासनाने संप काळातही एसटीचा गाडा पुढे जोमाने रेटण्यासाठी सेवानिवृत्तांची सेवा घेण्याचा विचार पुढे केला. जे कर्मचारी अलीकडेच निवृत्त झाले. ज्यांना ६२ वर्ष पूर्ण होण्यास ६ महिने उरले आहेत. अशा सेवानिवृत्तांना बोलाविण्यात आले. त्यांना २० हजार रुपये मानधन देण्याचे ठरविण्यात आले.
नागपूर विभागात अलीकडेच १३५ कर्मचारी सेवा निवृत्त झाले. प्रशासनाने सर्व १३५ जणांशी संपर्क साधला. यापैकी पुन्हा सेवा देण्यासाठी प्रशासनाला केवळ १० अर्ज प्राप्त झाले. प्रशासनाने १० ही अर्जांचा विचार करून त्यांची निवड केली. या १० पैकी ६ जणांवर आधीच्या कार्यकाळात अपघाताची नोंद असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यामुळे ते अपात्र ठरले. उरलेल्या ४ जणांची निवड करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
हेही वाचा: स्मशानात अंत्यसंस्काराची तयारी, दवंडी अन् स्वच्छताही, बेबाबाईंचा संघर्षमयी प्रवास
वैद्यकीय तपासणीचा अहवाल ४ पैकी ३ जणांनी आणून दिला नाही. डोळे व इतर तपासणी त्यांची झाली. त्यात ३ जण अपात्र ठरल्याची माहिती आहे. या ४ जणांपैकी केवळ १ चालक पात्र ठरला. सध्या हा चालक इमामवाडा आगारात कार्यरत आहे. सेवानिवृत्त १३५ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १ कर्मचारी कार्यरत असल्याने सेवानिवृत्तांची सेवा घेण्याचा विचार प्रशासनाचा फिस्कटल्याचे दिसून येते.
''सेवानिवृत्तांची सेवा घेण्यात येत आहे. त्यांनी सेवा द्यावी की नाही, हा त्यांचा ऐच्छिक प्रश्न आहे. १३५ पैकी १० जणांचे अर्ज प्राप्त झालेत. त्यापैकी १ सेवानिवृत्त सध्या कार्यरत आहे.''
- नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक
Web Title: Nagpur St Retirees Sevala Short Response
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..