Nagpur: राज्यातील व्याघ्र प्रगणनेला ‘ब्रेक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील व्याघ्र प्रगणनेला ‘ब्रेक’

नागपूर : राज्यातील व्याघ्र प्रगणनेला ‘ब्रेक’

sakal_logo
By
राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

नागपूर : व्याघ्र प्रगणनेच्या पहिल्याच दिवशी वाघिणीने महिला हल्ला करून बळी घेतल्याच्या घटनेनंतर राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पातील प्रगणना बंद करण्यात आली आहे. बंद केलेली प्रगणना आता पुन्हा कधी करायची याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, शेजारच्या मध्यप्रदेशातील प्रगणना सुरू राहणार आहे.

देश आणि राज्य पातळीवर व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांसह काही अधिकारी आणि वनरक्षकांसह सर्वांनाच प्रगणनेचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार आता प्रगणनाही सुरु करण्याचा मुहूर्त ठरला होता. मात्र, सुरवात झाली नव्हती. १५ नोव्हेंबरपासून मध्यप्रदेशात व्याघ्र प्रगणना सुरु झाली. त्यानुसार महाराष्ट्रातही २० नोव्हेंबरपासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रगणनेस सुरवात करण्यात आली.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

मात्र, पहिल्याच दिवशी अघटित झाल्याने सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती वाढली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रगणना थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत प्रगणना सुरु करू नये, असेही म्हटले असल्याची माहिती पुढे आली आहे. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडलेली घटना दुर्दैवी आहे.

मात्र, ट्रांझिट लाइनचे काम करीत असताना वाघ दिसल्यास परत फिरायचे असे एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

देशात प्रथमतः ही प्रगणना एम एस ट्रायपेस इकॉलॉजिकल ॲपच्या साहाय्याने होत आहे. यात कुठेही कागदावर नोंदी घेण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. राष्ट्रीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने व्याघ्र प्रगणननेसाठी इकॉलॉजिकल हा ऑफलाइन ॲप तयार केला आहे. मोबाइलमध्ये हा ॲप डाऊनलोड करून घेतल्यानंतर या ॲपच्या साहाय्याने व्याघ्र प्रगणना केली जाणार असल्यामुळे ही खऱ्या अर्थाने पेपरलेस व्याघ्र प्रगणना ठरणार आहे.

या व्याघ्र प्रगणनेत पट्टेदार वाघांसह, मांसभक्षी, तृणभक्षी प्राणी गणना तसेच त्यांच्या अधिवासाचे संनियंत्रण करण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. राज्याचे वन विभाग, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था हे संयुक्तपणे हा कार्यक्रम राबवतात.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

प्रगणना चार टप्प्यात

एकूण ४ टप्प्यात ही प्रगणना होऊ घातलेली आहे. पहिल्या टप्प्यात मांसभक्षी प्राण्यांच्या ओळखचिन्हांचे सर्वेक्षण, ट्रान्सेक्ट रेषेवरील प्रगणना, अधिवासाची गुणवत्ता, मानवी हस्तक्षेपाची माहिती व प्राण्यांच्या विष्ठांचे सर्वेक्षण हे स्थानिक वन विभागाद्वारे नियतक्षेत्र स्तरावरून केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत केले जाते. तिसऱ्या टप्प्यात मागील व्याघ्र प्रगणनेनंतरच्या चौथ्या वर्षी व्याघ्र प्रकल्प व काही निवडक वन विभागांमध्ये सर्वेक्षण करण्यात येते.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात झालेल्या घटनेमुळे व्याघ्र प्रगणना सर्वच प्रकल्पासह वाघाचे अस्तित्व असलेल्या क्षेत्रात थांबविलेली आहे.

-युवराज, वनसंरक्षक (वन्यजीव)

loading image
go to top