Doctor Beating : तीन निवासी डॉक्टरांसह विद्यार्थ्याला मारहाण; मेडिकलमधील घटना

मेडिकलमध्ये ३७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह विद्यार्थ्याला मारहाण केली.
Doctor Beating
Doctor BeatingSakal
Summary

मेडिकलमध्ये ३७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह विद्यार्थ्याला मारहाण केली.

नागपूर - मेडिकलमध्ये ३७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह विद्यार्थ्याला मारहाण केली. या घटनेमुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मारहाण झालेल्या निवासी डॉक्टरांमध्ये डॉ. शुभम महल्ले, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. राहुल अग्रवाल यांच्यासह एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. सोमवारी (ता.१५) पाऊणे आठ वाजता कल्पेश यादव (वय ३७-शताब्दीनगर) याला नातेवाइकांनी कॅज्युल्टीमध्ये आणले. त्याला आतड्याचा गंभीर आजार होता. अचानक पोटदुखी वाढली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. सोनोग्राफीसाठी रेडिओलॉजी विभागात पाठवले.

सोनोग्राफीनंतर सीटी स्कॅन करण्यासाठी पाठवले. सीटी स्कॅन विभागात कमलेशची प्रकृती गंभीर झाली. तेव्हा सकाळी ११ वाजून १५ मिनिटे झाली होती. निवासी डॉक्टरांनी तत्काळ सीपीआर दिला, त्याला अतिदक्षता विभागात पाठवले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी थेट रेडिओलॉजी विभागात डॉक्टरांना मारहाण सुरू केली. डॉ. शुभम महल्ले, डॉ. राहुल अग्रवाल व सर्जरी विभागाची महिला निवासी डॉक्टर प्राची अग्रवाल तसेच बीपीएमटीच्या पदवीधारकालाही नातेवाईकांनी मारहाण केली.

इतरही नातेवाइकांनी केली मारहाण

निवासी डॉक्टरांना मारहाण होत असताना त्या डॉक्टरांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. मात्र उपस्थित अनेक नातेवाइकांनीही मारहाण केल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. रेडिओलॉजी विभागात पहिल्यांदाच रुग्ण दगावल्याची घटना घडली. दरम्यान अजनी पोलिस ठाण्यात निवासी डॉक्‍टर तक्रार नोंदवण्यासाठी गेले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी नातेवाइकांवर गुन्हा नोंदवण्यासाठी परवानगी दिली होती, परंतु उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला नव्हता.

कडेकोट सुरक्षा घडली घटना

मेडिकलमध्ये सुरक्षा यंत्रणेचा विषय नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. वारंवार सुरक्षेसाठी मार्ड निवासी डॉक्टरांचे आंदोलन होते, मात्र सुरक्षा वाढवण्यात येईल, या आश्वासनावर संप मिटतो. येथे फक्त महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ५८ जवान कार्यरत आहेत. यातील काही रजेवर आहेत. सध्या केवळ ५१ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ते तीन पाळ्यांत काम करतात. मार्डचे अध्यक्ष डॉ. मनीष बागडे यांनी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.

मेडिकलमधील मारहाणीच्या घटना

-१० ऑगस्ट २०२१ -ओटी-ई’मध्ये बूट घालून प्रवेश करताना रोखल्याने इम्प्लान्ट विक्रेत्याकडून ब्रदरला मारहाण

-२४ ऑगस्ट २०२१ - मेडिकलमध्ये ऑनलाइन सिस्टीम सांभाळणाऱ्या इंजिनिअरला डॉक्टरची मारहाण

-४ ऑक्टोबर २०२१ -मेडिकलच्या मदतनीसाकडून महिला नातेवाईकाला (ओटी-जी)मारहाण

-२ डिसेंबर २०२१ -बीपीएमटीमच्या विद्यार्थिनीला प्रियकराकडून मारहाण

निवासी डॉक्‍टरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते. सुरक्षारक्षकांची संख्या वाढवली. सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले. डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठीच आहेत. प्रत्येक डॉक्‍टर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठीच प्रयत्न करतो. रुग्ण गंभीर होईपर्यंत हा रुग्ण घरीच होता. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर उपचारासाठी नातेवाइकांनी आणले. या घटनेत सुरक्षारक्षकांसह सर्वांची चौकशी करण्यात येईल.

- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com