नागपूरची जलपरी, दोनशे पदकांची धनी!

आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुजा तळेगांवकरचा प्रेरणादायी प्रवास
आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुजा तळेगांवकर
आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुजा तळेगांवकरsakal

नागपूर : अवघ्या सहा वर्षांची असताना ती पहिल्यांदा पाण्यात उतरली. हळूहळू स्विमिंगमध्ये रुची वाढत गेली. पदकांमागून पदके जिंकत गेली आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. आज तिच्याकडे तब्बल दोनशेच्यावर पदके आहेत. एकाच स्पर्धेत सर्वाधिक सहा पदके जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम तिने करून दाखविला.

नागपूरचे भूषण ठरलेली ही जलतरणपटू आहे ऋतुजा तळेगांवकर. २० वर्षीय ऋतुजा ठरवून स्पोर्ट्समध्ये आली नाही. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये रघुजीनगरमधील कामगार कल्याण केंद्रातील समर कॅम्पमध्ये आली असता, तिला बाजूच्याच ''स्विमिंग पूल''मध्ये मुले-मुली शिकत असल्याचे दिसले. हा खेळ आवडल्याने तिने आईकडे हट्ट धरला. ऋतुजाच्या इच्छेचा मान राखत आईने तिला स्विमिंगमध्ये टाकले आणि तेथूनच खऱ्या अर्थाने तिचा मॅरेथॉन प्रवास सुरू झाला.

आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुजा तळेगांवकर
दक्षिण मुख्यालयातर्फे लघुपट व चित्रकला ऑनलाइन स्पर्धा

अनुभवी प्रशिक्षक संजय बाटवेंच्या मार्गदर्शनात घडलेल्या ऋतुजाने अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली. शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याचा सुरू झालेला सिलसिला आजपर्यंत कायम आहे. जवळपास बारा वर्षांच्या कारकिर्दीत ऋतुजाने विविध स्पर्धांमध्ये शंभर सुवर्णांसह दोनशेच्या पदके व ट्रॉफीज जिंकल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी जालंधर (पंजाब) येथे झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत मिळविलेली तीन सुवर्णांसह जिंकलेली विक्रमी सहा पदके तिची राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी ठरली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात आजवरचा हा विक्रम आहे. उल्लेखनीय म्हणजे देशभरातील ६८ विद्यापीठांचा सहभाग असलेल्या त्या स्पर्धेत ऋतुजाने दुसरी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळविला होता.

ऋतुजाचा प्रेरणादायी प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिने दोनदा झेप घेतली. २०१८ मध्ये इजरायलमध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप व त्यानंतर २०१९ मध्ये कुवैत येथे झालेल्या आशियाई ओपन वॉटर चॅम्पियनशिपमध्ये तिने देशाचे प्रतिनिधित्व केले. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये बी. कॉम. ची विद्यार्थिनी असलेल्या ऋतुजाला भविष्यात आशियाई किंवा संधी मिळाल्यास ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवायचा आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे सोपी गोष्ट नाही, याची तिलाही जाणीव आहे. मात्र स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीची तिची पूर्ण तयारी आहे.

ऋतुजाला अगदी पहिल्या दिवसापासून मी पाहात आलोय. तिच्यात भरपूर टॅलेंट आहे. बारा वर्षांत दोनशेवर पदके जिंकून तिने ते सिद्धही करून दाखविले आहे. तिची सिनियर गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून, अशीच मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरी राहिल्यास नक्कीच तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

-संजय बाटवे, ऋतुजाचे प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com