
Nagpur : तेलंगखेडी मैदानावर दारूच्या पार्ट्या!
तेलंगखेडी : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल आणि नागरिक जागरूक नसतील तर एखाद्या चांगल्या मैदानाची काय अवस्था होऊ शकते, हे पाहायचे असेल तर तेलंगखेडी मैदानात या. येथील मैदानावर प्रवेशद्वार नसल्याने रात्रीच्या सुमारास चक्क दारूच्या पार्ट्या रंगतात. त्यामुळे परिसरातील महिलांचा प्रचंड त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या रामनगर परिसरात महानगरपालिकेचे मोठे मैदान आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या मैदानाची भकास अवस्था आहे. मैदानाच्या सभोवताल संरक्षक भिंत बांधण्यात आली; परंतु दोन्ही प्रवेशद्वार सताड उघडे राहत असल्याने हे मैदान आज असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनले आहे.
रात्र झाल्यानंतर अनेक तरुण पोरं दारूच्या बाटल्या आणून येथे उशिरा रात्रीपर्यंत पार्ट्या करतात, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका तरुणाने दिली. उल्लेखनीय म्हणजे, मैदानात शिवमंदिर आहे. तरीही खुलेआम पोटात पेग रिचविले जातात. जवळपास दररोजचाच हा घटनाक्रम बनल्याने आजूबाजूचे नागरिकही त्रस्त आहेत.
विशेषतः महिला तरुणींमध्ये भीती व असुरक्षितेचे वातावरण आहे. नाही म्हणायला या भागात कधीकधी पोलिसांचा एखादा चक्कर होतो; पण यात सातत्य नसल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळेच तरुणांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय या मैदानावर खुल्यामध्ये शौचही करीत असल्याचे सांगण्यात आले.
इकडे खेळ अन् तिकडे जनावरांचा वावर
या मैदानावर केवळ दारुड्यांचाच वावर नाही तर मोकाट जनावरांचाही प्रचंड हैदोस आहे. मैदानावर एकीकडे गायी-म्हशी दिवसभर चर्वण करीत असतात तर दुसरीकडे परिसरातील लहानलहान मुले क्रिकेट खेळत असतात. एखाद्या जनावराने चुकून लाथ किंवा शिंग मारल्यास मुलाच्या जीवितास धोका होऊ शकतो.
मोकाट कुत्र्यांचा हैदोस
शहरातील अन्य भागांप्रमाणेच रामनगरमध्येही मोकाट कुत्रे व जनावरांचा प्रचंड हैदोस पाहायला मिळतो. जागोजागी कुत्रे व जनावरे खाद्यान्नाच्या शोधात दिवसभर फिरत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास तर होतोच, शिवाय नागरिकांच्या जीवितास धोकाही आहे.
उघड्यावर टाकतात उष्टे अन्न
रामनगर भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी तशी उच्च शिक्षितांची वस्ती आहे. मात्र येथील रस्त्यावरची अवस्था पाहून लोक स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असतील असे वाटत नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर कचरा पडलेला दिसतो. उष्टे अन्नदेखील उघड्यावर फेकून देतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.
...तर मैदान सुंदर बनू शकते
हे मैदान केवळ खुली जागा आहे. येथे ना हिरवळ आहे, ना वृक्षारोपण झाले आहे. शिवाय ना वॉकिंग ट्रॅक, ना ग्रीन जीम. त्यामुळे ऐसपैस जागा असूनही सर्वत्र भकास चित्र आहे. मनपा प्रशासनाने मनावर घेतल्यास शहरातील इतर मैदानांप्रमाणे हेही मैदान सुंदर बनू शकते.