अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला भरीव मदत

एलआयटीला १० कोटी, गोरेवाडात आफ्रिकन सफारीसाठी १०० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ६१५ खाटांचे
अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला भरीव मदत

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेच्या(एलआयटी) विकास कामासाठी राज्य शासनाने शुक्रवारी अर्थसंकल्पामध्ये दहा कोटींच्या निधीची घोषणा केली. एलआयटीच्या विकासात्सक कामासाठी हा निधी खर्च केल्या जाणार आहे. ‘एलआयटी’च्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विकास कामांसाठी ५० कोटींची मागणी करण्यात आली होती. एलआयटी मध्य भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील नामवंत संस्था आहे. या संस्थेमध्ये निघालेले विद्यार्थी आज देश विदेशात मोठ्या हुद्यावर आहेत. तर अनेकांनी स्वत:चे व्यवसाय उभारले असून रोजगार उभा केला आहे. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे नागपूर विद्यापीठाच्या ‘एलआयटी’चा विकास खुंटला होता.

त्यामुळे माजी विद्यार्थी संघटनेने एलआयटीच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर ५० कोटींचा प्रस्ताव नागपूर विद्यापीठाने शासनाला पाठवला होता. मात्र, राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये दहा कोटींच्या निधी मंजूर झाल्याची घोषणा केली. यासाठी विधीसभेच्या बैठकीमध्ये सदस्या स्मिता वंजारी यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मात्र, कुलगुरूंनी यावर आपली नाराजी व्यक्त करीत ५० कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. दरम्यान या पैशामुळे एलआयटीच्या विकासात्मक कामास सुरुवात होईल अशी अपेक्षा संचालक डॉ. राजू मानकर यांनी व्यक्त केली.

असा होणार खर्च

  • संशोधन प्रयोगशाळा आणि पायलट प्रोजेक्ट

  • क्रीडा सुविधा

  • लायब्ररी अपग्रेडेशन (रेडिओ आरएफआयडी सिस्टम, ई-डिजिटल लायब्ररी)

  • नवीन मुलींचे वसतिगृह

  • मुलांच्या वसतिगृहांचे नूतनीकरण

  • अमरावती रोडवरील समोरील प्रवेशद्वार

  • कॅम्पस सुशोभीकरण आणि लँडस्केप्स

  • एलआयटीच्या मुख्य इमारतीभोवती कंपाउंड वॉल

नागपूर : राज्याच्या अर्थसंकल्पाने नागपूरला काय दिले अशी विचारणा होत आहे. उपराजधानीचा दर्जा असताना नागपूर शहराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. मात्र, अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचे दिसून येते. उत्तर नागपुरातील सहाशे खाटांच्या इस्पितळासाठी तब्बल ९०० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच शहराच्या वेशीवर असलेल्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील आफ्रिकन सफारीसाठी शंभर १०० कोटी मंजूर केले. लक्ष्मी नारायण इंस्टिट्यूटलाही १० कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात नागपूर ठळकपणे उमटल्याचे दिसून येते.

गोरेवाडात आफ्रिकन सफारीसाठी १०० कोटी

नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याची सुमारे ९०० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे विदर्भात पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन या प्रकल्पाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारल्याचे दिसते. राज्याचे पर्यटणनमंत्री शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी गोरेवाडाची जंगल सफारी केली आहे. त्यांच्याच हस्ते बाळासाहेबांचे नाव देण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाला भरीव निधी मिळेल अशी अटकळ बांधल्या जात होती. आफ्रिकन सफारीसाठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद केल्याने विदर्भाच्या पर्यटनाला मोठा बुस्ट मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या शिफारशीवरून गोसेखुर्द सिंचन प्रकल्पात जलपर्यटनाची घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ६१५ खाटांचे

इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन संस्थेची घोषणा अर्थसंकल्पात पुन्हा केली आहे. नवीन पदव्युतर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम तसेच ६१५ खाटांचे रुग्णालय येथे साकारले जाणार आहे. यामुळे रुग्णालयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. हा प्रकल्प एकूण ९१७ कोटींचा असणार आहे. त्यातील बांधकामासाठी ११६५.६५ कोटी रुपयांच्या खर्चासह प्रतिवर्षी ७८.८० कोटींच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. ११६५. ६५ कोटींचा खर्च सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून अनुक्रमे ७५ः २५ या प्रमाणात करण्यात येणार आहे. संस्थेच्या श्रेणीवर्धनासाठी ७५ टक्के म्हणजेच एकूण ८७४.२३ कोटींचा निधी असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या श्रेणीवर्धनासाठी अतिविशेषोपचार विभाग व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने ४ मार्च २०१४ मध्ये घेतला. यानंतर फडणवीस यांच्या काळात हा प्रस्ताव थंडबस्त्यात होता.

१७ पदव्युत्तर अभ्यासक्रम

साडे सात एकर विस्तीर्ण परिसरातील ही संस्था उभारण्यात येणार आहे. साडे आठ एकरमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था, उद्यान, क्रीडांगण, सभागृह असेल. विदर्भ व मध्य भारतात पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थांची कमतरता या संस्थेमुळे भरून निघेल. अतिविशेषोपचाराची सुविधा उपलब्ध होईल. कार्डिऑलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी, न्यूरोसर्जरी, हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र, हिमटोलॉजी हे सहा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम येथे प्रस्तावित करण्यात आले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध वैद्यकशास्त्र, बालरोग चिकित्साशास्त्र, त्वचा व गुप्तरोग, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, रक्तपेढी, जीव रसायनशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, शल्य चिकित्साशास्त्र, अस्थी व्यंगपोचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, नाक-कान-घसाशास्त्र, नेत्रशल्य चिकित्साशास्त्र, रुग्णालयीन प्रशासन, इमर्जन्सी मेडीसिन आदी १७ अभ्यासक्रम येथे प्रस्तावित करण्यात आले आहेत.

मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल

संपूर्ण मध्यभारतातील रुग्ण दररोज हजारोंच्या संख्येने उपचारासाठी नागपुरात येतात. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांची मोठी मालिकाच येथे निर्माण झाली आहे. त्यात सातत्याने भर पडत असून नागपूरची मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्या शासकीय महाविद्यालयात (मेडिकल) १४०० खाटा व इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात (मेयो) ८८3 खाटांची व्यवस्था आहे.

संस्थेची वैशिष्ट्ये

  • अस्तित्वातील संस्थेचे अपग्रडेशन करणार

  • १७ पदव्युत्तर, ११ अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू होणार

  • रुग्णालय प्रशासन, व्यवस्थापन विभाग व दंत बाह्यरुग्ण विभाग असेल

  • अभ्यासक्रमांशी संबंधित ६१५ खाटांचे रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com