
Toor Dal Rates : भातासोबत आता खायचं तरी काय? पंधरा दिवसात तूर डाळ १५ रुपयांनी महागली
नागपूर : एकीकडे खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईमुळे नागरिकांचे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी ताटातून वरण गायब होण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसात तूर डाळ १५ रुपयांनी महागली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तर १६० रुपये किलोवर पोहोचला आहे.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. देशात तूर डाळीचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास आणि राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या साठ्याची माहिती सरकारला देण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर राज्यांना सध्याच्या तूर साठ्याचा डेटा ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलाइन
ताटातून वरण गायब
मॉनिटरिंग पोर्टलवर अपडेट करावा लागणार आहे तसे आदेशही काढले आहेत. तूर आणि उडीद डाळीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत साठ्यावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
साठ्यावर मर्यादा
तूर आणि उडीद डाळीसाठी साठा मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी २०० टन, किरकोळ विक्रेते आणि किरकोळ दुकानदारांसाठी पाच टन आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये २०० टन ठेवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमध्ये ठेवलेली डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
भाववाढीची कारणे
देशाचे तूर उत्पादन मागील वर्षीच्या ४.२२ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२२-२३ जुलै-जूनमध्ये ३.४३ दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. तसेच यंदाचा मॉन्सूनही लांबण्याची शक्यता आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच तूर डाळीचा भाव वाढत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मागील वर्षी मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले होते. परिणामी, तूर दरात वाढ होत आहे
खाद्य तेल स्वस्त
खाद्य तेलाच्या बाजारात सध्या शांतता असल्याने सोयाबीन तेलाच्या दरात गेल्या पंधरा दिवसात प्रतिकिलो सहा ते सात रुपयांची घट झालेली आहे. विदेशातूनही तेलाची आयात होत असल्याने त्यात अजून घट अपेक्षित आहे. सोबतच शेंगदाणे तेलही प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांनी स्वस्त होणार आहेत.
-प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघ