Nagpur : पास विद्यार्थी रस्त्यावर होऊ शकतो नापास; वेगाने वाहन चालवणाऱ्यांमध्ये ७४ टक्के युवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rto

Nagpur : पास विद्यार्थी रस्त्यावर होऊ शकतो नापास; वेगाने वाहन चालवणाऱ्यांमध्ये ७४ टक्के युवा

नागपूर : बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यानंतर पालकांकडे मुलं दुचाकीची मागणी करतात. पालकही मुलांचे हट्ट पूर्ण करतात. परंतु हा निर्णय अनेकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. परीक्षेत पास झालेला विद्यार्थी रस्त्यावर वाहन चालविण्याच्या परीक्षेत मात्र नापास होउ शकतो. एका सर्वेक्षणातून वाहनांच्या अपघातात ७२ टक्के तरुणांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तरुणच नाही तर अल्पवयीन मुलांमध्येही महागड्या गाड्यांची क्रेझ आहे. गाडी चालवताना मुलांचे वेगावर नियंत्रण नसते. तसेच वाहतुकीचे नियम मुलांना अवगत नसतात. परिणामी मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे. शहरात दहा लाखांवर किंमत असणाऱ्या गाड्यांची संख्या वाढलेली आहे. गाड्या खरेदी करण्यामागे त्या गाड्यांची आकर्षक रचना आणि लक्झरी सुविधांसहच असलेला कमाल वेग हे देखिल तरुणांना आकर्षित करत आहे.

शहरातले अनेक रस्ते या वेगवान गाड्यासाठी अयोग्य असल्याने अपघातांची जोखीम वाढत चालली आहे. महागड्या गाड्या चालविणाऱ्यांकडून वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे क्रेझच्या नादात प्रचंड वेगाने धावणाऱ्या गाड्या दुभाजकावर आदळण्याच्या घटना घडल्या आहेत. अधिक अरुंद असलेल्या रस्त्यावरील दुभाजक मृत्यूचे सापळे ठरत आहेत. या गाड्याच्या वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलिस स्पीड गनने वॉच ठेवत असले तरी अनेकांना कारवाईचे भय राहिलेले नाही. त्यात या गाड्यांचा असलेला वेग पाहता स्पीड गनदेखील या गाड्यांचे नंबर टिपण्यात अपयशी ठरत आहेत.

येथे होतात स्टंट

स्टंट करण्यात युवक आघाडीवर आहेत. सीताबर्डी, फुटाळा, अंबाझरी, कोराडी, कळमना, सोनेगाव, सावनेर आणि अमरावती मार्गावर अनेक दुचाकीस्वार स्टंटबाजी करतात. हे स्टंट करणारे महाविद्यालयीन तरुण आहेत.

अपघातात बळी पडतात ७२ टक्के युवा

नागपूर वाहतूक पोलिसांनी २०२० मध्ये ६९३१ चालकांवर वेगाने वाहन चालविण्याबाबत कारवाई केली तर २०२१मध्ये २२ हजार १५८ तर २०२३ मध्ये २५ हजारांवर चालकांवर दंडात्मक कारवाई केली. भरधाव वाहन चालवणाऱ्यांमध्ये ७४ टक्के युवा आहेत. तरुणींमध्येही वेगाने वाहने चालवण्याचे प्रमाण मोठे आहे. अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये ७२ टक्के युवांचा समावेश आहे.