नागपूर : कोरोनानंतर बदलला पर्यटनाचा ‘ट्रेंड’

परिवारासह पर्यटनावर भर : निसर्ग सानिध्यातील स्थळांना पसंती
पर्यटन
पर्यटनsakal

नागपूर : कोरोना काळात सलग दीड वर्ष अनेक परिवार आप्तस्वकियांपासून दूर राहिल्याने कंटाळलेले आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना अनेकांनी बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. पूर्वी पर्यटनाला जायचे म्हटले की आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या हॉटेल, रिसोर्टला पसंती दिली जात होती. त्यात ट्रेंडमध्ये आता बदल झाला असून त्यांना जंगलातल्या, आडरानातल्या वाटा खुणावू लागल्या आहेत. म्हणूनच नेचर ट्रेल्स, जंगल सफारींना चांगला प्रतिसाद मिळू लागलाय. याच वैशिष्ट्य म्हणजे, सर्व वयोगटातील लोक तिथे जाताना दिसत आहेत. कमी खोल्यांचे आणि परिवाराशिवाय कोणी संबंधित रिसॉर्टमध्ये नाहीत ना याची खात्री करूनच बुकिंग केली जात आहे.

दीड वर्षापासून लहानमुलांपासून ते सर्वच जण घरात बंदीस्त झाले होते. दुरावलेल्या परिवारांनी आता संयुक्तपणे पर्यटनाला जाण्याच्या योजना आखलेल्या आहेत. त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. हिवाळ्यात वातानुकूलित खोल्यांची गरज नसल्याने अनेकांनी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रिसॉर्ट, होम स्टे अथवा गावापासून दूर असलेल्या सामान्य हॉटेलला पसंती देऊ लागले आहेत. पर्यटकांच्या बदललेल्या आवडीमुळे गर्दीपासून अलिप्त असलेल्या राहण्याच्या ठिकाणावर पर्यटकांचा उड्या पडू लागल्या आहेत. तसेच आपल्या परिवाराशिवाय दुसरे कोणीच त्या रिसॉर्ट अथवा होम स्टेमध्ये नसावे त्यादृष्टीने कमी खोल्या असलेल्या ठिकाणांना पसंती देत आहेत. त्याचा मुख्य उद्देश सुरक्षितता हाच असल्याचे पर्यटन कंपनीचे संचालक भूषण शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी ते अधिकचे पैसेही मोजायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटन
आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून फायद्याची शेती करा : प्रविण माने

पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्याला अधिक पसंती देत असताना यानिमित्ताने परिवाराचे एक स्नेहमिलनही होऊ लागले आहेत.एकाच ठिकाणी सर्व परिवार एकत्र राहू लागल्याने विना अडथळा, बिनधास्तपणे आनंद लुटत आहेत. कोरोनानंतर फिरण्यापेक्षा परिवारासह एकत्रित राहण्याचा नवीन ट्रेड यानिमित्ताने पुढे आला आहे. त्यामुळेच पावसाळ्याच्या सुटीनंतर पर्यटन सुरु होण्यापूर्वीच ताडोबा-अंधारी, नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वाराचे बुकिंग हाऊसफुल्ल झालेले आहेत. मध्यप्रदेशातील तुरीया गेटवरील रिसॉर्ट,हॉटेल्स आणि होम स्टेचे बुकिंग झालेले आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून पर्यटक येत नसल्याने आर्थिक घडी विस्कटलेल्या रिसॉर्ट, हॉटेल्स आणि होम स्टेच्या संचालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलले आहे. यानिमित्ताने जिप्सी, गाइड, हॉटेल चालक, ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांनाही काम मिळू लागले आहे.

राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून रिसॉर्ट सुरु केलेले आहे. त्यात परिवारासह येणाऱ्या पर्यटकांचा ट्रेंड वाढू लागला आहे. परिवारासह एकत्रित राहून पर्यटनासह स्नेहमिलनाचाही आनंद लुटत आहेत.

-अलोक पांडे, छावा रिसॉर्ट, कोलारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com