Nagpur : ओव्हरलोड ट्रकांमुळे कोंडला दाभ्याचा श्वास! Nagpur trucks overloaded Kondla breathed sigh relief! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतुकीची कोंडी होत

Nagpur : ओव्हरलोड ट्रकांमुळे कोंडला दाभ्याचा श्वास!

अखिलेश गणवीर

दाभा : नाका वाचविण्यासाठी वस्तीतील लहान रस्त्यावरून दहा, बारा आणि सोळा चक्का अशा मोठमोठ्या ट्रकांची वाहतूक सुरू आहे. हा प्रकार दाभा भागात सर्रास सुरू आहे. वस्तीत वाहतुकीची कोंडी होत असून, अपघात नित्याचेच झाले आहेत.

लहान मुले रस्त्यालगत खेळतात. अरुंद रस्त्यांमुळे दुचाकीधारक खाली पडतात. स्थानिकांना याचा मोठा त्रास आहे. नागरिकांनी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रारी केल्या; मात्र काहीही उपयोग झाला नसल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे.

धुळीमुळे वाढला श्वसनाचा त्रास

ट्रकांच्या वाहतुकीने वस्तीतील रस्ते खराब झाले आहेत. धूळ घरात शिरते. भांड्यावर धुळीचे कण जमा होतात. रात्रभर ट्रक जात असल्याने झोपेत श्वसनमार्गाने धूळ नाकावाटे शरीरात जाते. त्यामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.

खडगाव-दाभा रस्ता मंजूर

खडगाव रोड ते दाभा या सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. साठ फुटाचा हा रस्ता मंजूर आहे. अर्धवट झाला. मात्र, वस्तीतून झाला नाही. हा रस्ता झाला तर ही अडचणी दूर होतील. आहे. मात्र, अधिकारी-लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाच्या उदासीनतेने या रस्त्याचे काम रखडल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. आमदार विकास ठाकरे यांनी लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणीही नागरिकांची आहे.

नाका बुडविण्यासाठी वस्तीत घुसखोरी

खडगाव रोड ते दाभा हा रस्ता अर्धवट सिमेंटीकरणाचा झाला आहे. वस्ती असल्याने सिमेंटीकरणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पुढे वस्तीतून लहान रस्ता आहे. एक किलोमाटरच्या या मार्गावर रस्त्याला लागून घरे आहेत. येथून हा मार्ग रिंग रोडला लागतो. वाडी ते काटोल रोड असा हा रिंग रोडचा भाग वस्तीतून जाताना लागतो.

वाडीमध्ये नाका आहेत. मुख्य रस्ता असल्याने पूर्वी सर्वच ट्रक याच मार्गाने जात होते. आता मात्र नाका वाचविण्याच्या नादात सर्वच ट्रक दाभा वस्तीत घुसू लागले. ट्रकांची एवढी संख्या वाढली की, २४ तास वस्तीतून ट्रकांची वाहतूक सुरू असते. रहिवासी भागातून होणाऱ्या वाहतुकीला रहिवाशांचा विरोध आहे. मात्र, ट्रक माफियापुढे नागरिक हतबल आहेत.

मालवाहतूक गाड्यांची वाढली संख्या

नाका वाचविण्यात ट्रक वाहतुकीबरोबरच मालवाहतूक गाड्यासुद्धा वस्तीत शिरतात. त्यामुळे वस्तीत आणखीच वाहतुकीची कोंडी होते. नागरिकांनी यालाही विरोध केला. मात्र, वरदहस्त असल्याने लहान रस्त्यावर सर्रास गाड्या धावू लागल्या आहेत.

प्रशासनावर स्थानिकांचा संताप

नाका चुकविण्याच्या नादात ट्रक माफिया या वस्तीच्या रस्त्याने सक्रिय झाले आहेत. मोठ्या प्रमाणात ही उलाढाल सुरू असून, नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना हा प्रकार दिसत नाही का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक दिलीप बोरकर, बाळू वारोदकर, सचिन गंधरवार, विलास फुलके,

यादवराव कोठ, प्रकाश पाटील यांनी केला. रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्याने व लहान मुलांच्या जिवाला धोका असल्याने आपले नेहमीच ट्रक चालकांसोबत वाद झाल्याचे सचिन गंधरवार यांनी सांगितले. वस्तीतील लोकांच्या हितासाठी ट्रक वाहतुकीला आळा घालावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली.