
नागपूर - सख्ख्या अल्पवयीन भाचीवर अत्याचार करणाऱ्या मामास अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच वर्षे कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली. मामा विरोधात कळमना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. विशेष म्हणजे, जलद गतीने तपास पूर्ण करून केवळ आठ महिन्यांत या प्रकरणाचा निकाल लागला.
न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. मामा आणि पीडित भाची हे एकाच परिसरात राहतात. पीडितेची आई स्वयंपाक करण्याचे काम करीत असल्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ६.३० घरी नसते. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी बारा वर्षीय पीडित मुलगी टी. व्ही. पाहत होती; तर, तिची लहान बहीण बाहेर खेळत होती.
त्यावेळी तिचा मामा दारू पिऊन घरात आला व त्याने दरवाजा बंद केला. पीडितेशी लगट करीत असताना त्याने तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढले. तिने आरडा-ओरड केली. मात्र, घराच्या खिडक्या लावून असल्याने आवाज बाहेर गेला नाही. तसेच मामाने आई-वडिलांचा खून करायची धमकी दिली. त्याच वेळी तेथे पीडितेची आजी आली व त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. पीडितेने आरोपीस धक्का देत लगेच घराचे दार उघडले. आजीने पीडितेला धीर मुलीला फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर, पीडितेसह पालकांनी पोलिस ठाणे गाठत मामाविरूद्ध तक्रार दिली. न्यायालयाने सर्वांच्या साक्ष आणि पुरावे लक्षात घेता आरोपी मामास दोषी ठरविले. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. श्याम खुळे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. कुंदन नितनवरे, ॲड. शशांक कोटांगळे यांनी बाजू मांडली.