
Nagpur : कैदेतील ‘वनबाला’चा ‘वनवास’ संपणार का?
अखिलेश गणवीर
सेमिनरी हिल्स : हिल्स स्टेशन नसले तरी पहाड व जंगल फिरण्याचा आनंद शहरात केवळ एकाच ठिकाणी अनुभवण्याचे एकमेव स्थान म्हणजे सेमिनरी हिल्सचे बालोद्यान. बच्चेकंपनीचा चांगला ‘एन्जॉय’ व्हावा, म्हणून पालक त्यांना आवर्जून या ठिकाणी आणतात. ‘वनबाला’ ही टॉय ट्रेन बच्चे कंपनींसाठी येथे मुख्य आकर्षण आहे. मात्र, कोरोनामुळे बंद पडलेली वनबाला अद्याप सुरू झालेली नाही. पालक मुलांना घेऊन येतात; मात्र ट्रेन बंद असल्याचे कळताच निराश होऊन निघून जातात. वन विभागाने वनबालाला कैद करून ठेवले. वनबालेचा हा वनवास कधी संपणार? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
शहरातील हिरवळीचे सर्वात सुंदर ठिकाण म्हणून सेमिनरी हिल्सकडे बघितले जाते. येथे असलेल्या बालोद्यानमध्ये टॉय ट्रेनमधून जंगल सफारीचा आनंद घेता यावा, म्हणून वन विभागाने छोटी रेल्वेगाडी सुरू केली. आज तिला जवळपास ४५ वर्षे होत आहे. १९७८ मध्ये पहिल्यांदा वनबाला धावली. त्यानंतर काही ना काही अडचणींमुळे वनबालाचा प्रवास थांबत सुरू आहे.
कोरोनापूर्वी नियमितपणे ती धावत होती. मात्र, कोरोनानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे वन विभागाने तिला आपल्या निवासात कैद करून ठेवले. कोरोनानंतर संपूर्ण जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटत आहे. तरीसुद्धा वनबाला कैदच आहे.
त्यामुळे कैदेतून बाहेर काढून माझा वनवास कधी संपविणार, असा सवाल आता वनबालाही विचारू लागली असणार? मात्र, वनबालाच्या स्थितीकडे वन विभागासह सरकारचेसुद्धा दुर्लक्ष आहे. वनबालाच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून निधीसाठी प्रयत्न झाले. पण, प्रश्न काही सुटला नाही.
मुले, पालक येतात अन् विचारून निघून जातात
इतर दिवसांसोबतच शनिवार आणि मुख्यतः रविवारी पालक मुलांना घेऊन आवर्जून येतात. वनबाला सुरू आहे का? असा प्रश्न विचारतात; मात्र सुरू नसल्याचे कळताच निराश होऊन निघून जातात. शहरातील कानाकोपऱ्यातून पालक मुलांना घेऊन खास ‘ट्रॉय ट्रेन’ची जंगल सफारी घडविण्यासाठी अद्यापही येत आहेत.
कर्मचाऱ्यांकडून वनबाला बंद असल्याचे कळताच निराश होऊन निघून जातात. यंदा २६ जानेवारीला वनबाला सुरू होणार असा संदेश पालकांना मिळाला होता. त्यामुळे या दिवशी वनबालाकरिता प्रचंड गर्दी झाली होती. आपल्या दोन मुलांना येथे घेऊन आलेले शैलेश बन्सोड यांनी सांगितले की,
मुलांना खेळण्यासाठी असलेले झुले शहरातील बहुतांश बगिच्यांमध्ये आहे. मात्र, ट्रॉय ट्रेन शहरातील एकमेव याच ठिकाणी आहे. पण तीसुद्धा बंद असल्याचे कळल्याने मुलांसोबतच आपला हिरमोड झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
रविवारी व्हायच्या २० फेऱ्या
मुलांसाठी रविवारचा दिवस फुल्ल ‘एन्जॉय’चा होता. वनबाला सुरू असताना एकाच दिवशी २० फेऱ्या होत होत्या. मुलांनी भरगच्च ट्रेन धावत होती. लहानांसोबतच मोठेसुद्धा वनबालाचा आनंद घेण्यात काही कमी नव्हते. त्यामुळे वन विभागाने मोठ्या व्यक्तिंकरिता ३० रुपये, तर लहान मुलांकरिता १५ रुपये तिकीट दर ठेवला होता. काही दिवसात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. मुलांच्या हौसेखातर पालक येथे घेऊन येतील. मात्र, आता हा आनंदच वनविभागाने हिरावून घेतला असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
रूळ व इंजीन खराब
झुकझुक आवाजात मुलांना घेऊन धावणाऱ्या वनबालाचा संपूर्ण ट्रॅक पावणेदोन किलोमीटरचा आहे. रुळाची छोटी लाईन लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. परंतु, सध्या रेल्वे रूळ खराब झाले आहेत. रुळाखालील लाकडी स्लिपरची दयनीय अवस्था आहे.
येथे जवळपास ४ हजार स्लीपर लागत असल्याची माहिती आहे. काही ठिकाणांहून ट्रॅक दिसेनासा झाला. इंजिनासह पूर्ण ट्रॅक दुरुस्त करून वनबालाला पुन्हा सुरू करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.