
नागपूर : दोन तासांच्या पावसांत घरांत शिरले पाणी
नागपूर - दोन दिवसांपासून काही भागात तुरळक पडणाऱ्या पावसाने शनिवारी धुव्वाधार बॅटिंग केली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांत पाणी शिरले. तर विमानतळ परिसरात वीज पडल्याने विमानतळ व्यवस्थापनातील दोन अभियंते जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने विमानतळ प्रशासन व प्रवासी चांगलेच हादरले. सायंकाळी दोन तासांच्या पावसाने नागपूरकरांची तारांबळ उडाली तर उघडीप मिळूनही प्रशासनाकडून काहीच उपाययोजना न झाल्याचेही अधोरेखित झाले.
शहरात दररोज पावसाची हजेरी सुरू आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सलग दोन तास पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. शहराच्या इतर सखल भागातील वस्त्यांमध्येही पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक नागरिकांना घरातील पाणी भांड्यात जमा करून बाहेर फेकावे लागले.
दाणादाण, हैरान
-चंद्रमणीनगरातील नाला ओव्हर फ्लो झाला. नाल्याचे पाणी साचल्याने अजनी पोलिस स्टेशन ते रामेश्वरी रस्ता जलमय झाला. परिणामी हा रस्ताच बंद पडला.
-याच भागातील जोशीवाडी येथील सार्वजनिक शौचालय परिसरातील अऩेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे बसपाचे उत्तम शेवडे यांनी सांगितले.
-रेल्वे पोलिस मुख्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचले. पाणी थेट कार्यालयात शिरल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
-अजनी येथील केंद्रीय विद्यालयातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून सायकल काढताना, पायी निघताना चांगलीच कसरत करावी लागली.
-हुडकेश्वर परिसरातील संजय गांधीनगरातील ३० हून जास्त घरांमध्ये पाणी शिरले. यात अनेकांकडील धान्य आदी भिजून नुकसान झाल्याची माहिती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शुभम पराळे यांनी दिली.
-मेडिकल चौक, जगनाडे चौक, अशोक चौकांमध्ये पाणी साचले.
-मानेवाडा रोड, हुडकेश्वर रोड, अयोध्या नगर रोड, सक्करदरा येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकीधारकांना चांगलीच कसरत करावी लागली.
मुख्य बाॅक्स
वॉकीटॉकीवर बोलतानाच वीज कोसळली; एक बेशुद्ध, दुसऱ्याच्या हातातील त्राण गेला
सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वीज कोसळून दोन अभियंते जखमी झाले. उपचारानंतर दोघांची प्रकृती बरी असल्याची माहिती पुढे आली आहे.
अहमदाबादला जाणारे इंडिगो विमान नागपूरच्या विमानतळावर उतरत होते. या विमानाशी ग्राउंड क्लियरन्स स्टाफवर असलेले अभियंते वॉकीटॉकीवर बोलत होते. दरम्यान, अचानक याच वेळी वीज कोसळली. वॉकीटॉकीच्या रेडिएशनमुळे दोन अभियंते विजेच्या संपर्कात आले. त्यात नागपूरचे अमित आंबटकर (वय २८) आणि उत्तराखंड काशीपूर येथील ऋषी सिंह (वय ३३) हे दोघे अभियंते विमानाची नियमित तपासणी करीत होते. त्यावेळी विमानाजवळ वीज पडली. या घटनेत आंबटकर बेशुद्ध झाले, तर ऋषी यांच्या एका हातातील त्राण गेला. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विमानावरच वीज कोसळल्याची चर्चा
वीज पडल्याने जखमी झालेल्या अभियंत्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. विमानतळ प्रशासन आणखी तांत्रिकदृष्ट्या सतर्क झाले आहे. घटना घडली तेव्हा विमानावर वीज कोसळल्याची चर्चा शहरात पसरली होती.
३० जुलैची ती घटना
विमानावर बसविलेल्या विशेष यंत्रणेमुळे विजेचा विमानावर काहीही परिणाम झाला नाही. पण कधीकधी विजेचा विमानाचे सेन्सार वा नेव्हिगेशनवर परिणाम होतो. ३० जुलैला गो-फर्स्टचे जी-८- २५१९ दिल्ली-नागपूर विमानावर आकाशातच वीज पडली होती. यातील नेव्हिगेशन यंत्रणा खराब झाली होती. त्यामुळे हे विमान मुंबईला रवाना झाले नव्हते.
Web Title: Nagpur Water Entered Houses After Two Hours Of Rain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..