
Heat Stroke : उष्माघाताने आणखी एक दगावला? नागपूर @ ४१.६, ढगाळ वातावरणामुळे दिलासा
नागपूर : उन्हाच्या लाटेने लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात बळी घेतला. रविवारी दोन जण मृत्यू पावल्यानंतर सोमवारी देखील एक जण मरण पावला. या मृत्यू सत्रामुळे उष्णलाट आता चांगलीच जीवघेणी ठरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताजबाग परिसरात ४५ ते ५० वयोगटातील व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. उपचारासाठी मेडिकलमध्ये भरती केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. हा उष्माघाताचा बळी असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.
उष्माघातामुळे आतापर्यंत दोन दिवसांत एकूण तिघांचा बळी गेला आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे आज उन्हाची लाट काहीशी ओसरली. त्यामुळे नागपूरच्या पाऱ्यात दीड अंशांची घसरण होऊन कमाल तापमान ४३.२ वरून ४१.६ अंशावर आले. अकोला आणि गडचिरोली येथे विदर्भात सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.