Nagpur : ‘यार्न बॉम्बिंग’ जोपासणारी अंजली बावसे Nagpur Yarn Bombing Anjali Baws | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंजली बावसे

Nagpur : ‘यार्न बॉम्बिंग’ जोपासणारी अंजली बावसे

नागपूर : शहरातील सांस्कृतिक वर्तुळातील नकारात्मक बाबींचा अप्रत्यक्षपणे कलावंतांवरही परिणाम होतो. याला यंत्रणेसह रसिकांची कलेप्रती आणि कलावंताप्रती असलेली वृत्ती देखील तितकीच जबाबदार ठरते. अशा स्थितीत कलावंतामध्ये क्षमता, सर्जनशीलता, सामाजिक भान असूनही तो पडद्या मागे राहतो. चित्रकार अंजली बावसे यांच्या बाबतीत नेमके तेच झाले. यार्न बॉम्बिंग कलाप्रकार साकारणारी देशातील ती पहिली महिला कलावंत आहे, हे विशेष.

गेल्या दोन दशकांपासून अंजली प्रामाणिकपणे आपल्या चित्रांमधून व्यक्त होत आहे. तिला लहानपणापासून चित्रकलेची आवड. कुटुंबीयांचा विरोध असतानाही तीने याच क्षेत्रात शिकून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ललित कलेमध्ये पदव्युत्तर (एमएफए) पदवी मिळवून चित्रकला व पेंटिंग विषयात तिने शास्त्रोक्त शिक्षण घेतले.

तिच्यातील प्रामाणिकपणामुळे आणि तिच्या गुणवत्तापूर्ण कामांमुळे तिला आजवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळाली. मात्र, ललित कलेच्या बाबतीत असलेल्या स्थानिक वातावरणामुळे अंजली तितकीशी प्रकाशझोतात येऊ शकली नाही. कलेच्या साधनेत तिने आपले संपूर्ण आयुष्य

यार्न बॉम्बिंग जोपासणारी अंजली बावसे

झोकून दिले असून त्यासाठी लग्नही न करण्याचा कठोर निर्णय घेतला.

जिद्द आणि चिकाटीमुळेच यार्न बॉम्बिंग हा कलाप्रकार आत्मसात करीत या प्रकारातील देशातील पहिली महिला कलावंत होण्याचा मान तिने पटकाविला. तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला २१ व्या ऑल इंडिया आर्ट कॉन्टेस्टमध्ये सुवर्ण पदक व ११ व्या कलावर्त इंटरनॅशनल आर्ट फेस्टिव्हलमध्ये गौरविण्यात आले आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित एका कार्यक्रमात पद्मश्री लक्ष्मा गौड यांनी तिच्यातील गुण ओळखत आपल्या स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी दिली. मागील वर्षी केंद्र शासनाच्या ललित कला विभागातर्फे रेसिडेन्सी आर्टिस्ट म्हणून तिची निवड झाली. सुमारे ८ वर्षे नाट्य क्षेत्र, ८ वर्षे कला शिक्षिका, दूरदर्शनवरील मालिकेतून काम अशा विविध पातळीवर काम करीत ती आजही संघर्ष करीत आहेत.

यार्न बॉम्बिंग म्हणजे काय?

यार्न बॉम्बिंग हा एक प्रकारचे भित्तिचित्र किंवा स्ट्रीट आर्ट आहे. या कलेत रंगाऐवजी विणकाम करीत, लोकर किंवा फायबरचा वापर करीत रंगांचे लक्षवेधक आच्छादन केले जाते. २००५ साली अमेरिकेतील टेक्सास येथे पहिल्यांदा हा कला प्रकार पाहायला मिळाला.

टॅग्स :NagpurNagpur Newscrime