Weather Update : विदर्भ गारठला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Weather Update

Weather Update : विदर्भ गारठला

नागपूर : विदर्भातील थंडीच्या लाटेने उग्र रूप धारण केले असून नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमधील तापमानात पुन्हा घट झाली आहे. रविवारी उपराजधानीत आणखी एका नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली, तर यवतमाळ विदर्भातील सर्वाधिक थंड शहर राहिले. थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

उत्तर भारतातील पहाडी भागांमध्ये सुरू असलेली जोरदार बर्फवृष्टी आणि त्याचवेळी राजस्थानकडून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे सध्या मध्य भारतात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दिसून येत आहे. शनिवारच्या तुलनेत नागपूरच्या सरासरी तापमानात चार अंशांची घसरण होऊन पारा पुन्हा या हिवाळ्यातील नीचांकीवर (११.४ अंश) आला. तीन दिवसांत नागपूरचा पारा चार अंशांनी खाली आला आहे. याशिवाय यवतमाळ येथे १०.० अंश सेल्सिअस, तर गोंदिया येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमधील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले.

लाटेमुळे केवळ रात्री व पहाटेच्या सुमारासच नव्हे दिवसाही थंडी जाणवू लागली आहे. हवेतील गारठ्यामुळे आजही नागपूरकर दिवसभर स्वेटर्स व जॅकेट्स घालून शहरात फिरताना आढळले.

विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

जिल्हा तापमान

यवतमाळ १०.०

गोंदिया १०.४

नागपूर ११.४

अमरावती ११.७

वर्धा १२.४

अकोला १२.४

गडचिरोली १२.६

बुलडाणा १३.०