
Nagpur News: वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरुन वाद; शिक्षिकांचा विरोध, तर ग्रामस्थ म्हणतात...
खापा : शाळा परिसर आणि वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्यामुळे शिक्षिका आणि मुलींची स्त्री सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप गडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षिकांनी केला आहे.
याप्रकरणी त्यांनी मुख्याध्यापकांना स्पष्टीकरण मागितले आहे. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सावनेर तालुक्यातील गडेगाव येथे जिल्हा परिषदेची एक ते सात वर्गापर्यंत शाळा आहे. जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. वर्ग खोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याच्या कारणास्तव येथील शिक्षिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे आमची व शाळेतील विद्यार्थिनींची स्त्री सुरक्षा धोक्यात आली आहे,
असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत मुख्याध्यापकांना तीन दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. तीन दिवसात स्पष्टीकरण न दिल्यास वरिष्ठांच्या कारवाईस आपण जबाबदार राहाल, अशी तक्रार येथील शिक्षिकांनी मुख्याध्यापकांकडे केली आहे.(Marathi Tajya Batmya)
शाळेतील वर्ग खोल्यात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विरोध करणाऱ्या शिक्षिकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक व तीन शिक्षिका कार्यरत आहेत. येथील शिक्षिका मुलांना व्यवस्थित शिकवीत नसल्याची पालकांची ओरड आहे.(Latest Marathi News)
त्यांनी याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती. पालकांच्या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायतीने १५ वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावले.
गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चांगले शिक्षण मिळावे व शिक्षकांवर लक्ष राहावे, या उद्देशाने हे कॅमेरे लावण्यात आले.
वर्ग खोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावताच, याबाबत मुख्याध्यापकांना तक्रार करून शिक्षिकांनी याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. जिल्हा परिषद शाळेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हटविण्याबाबत शिक्षिकांनी मागणी केली आहे. तर गावकऱ्यांना ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे.शिक्षक विद्यार्थ्यांना कितपत शिकवतात. हे ग्रामस्थांना व पालकांना कळावे तसेच शिक्षकांवर वचक राहावा. या उद्देशाने हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
छाया अडमाची, सरपंच ग्रा.पं.गडेगाव
येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मुलांना व्यवस्थित शिकवत नाही.मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. शाळेत आल्यावर आपल्याच कामात तसेच मोबाईलमध्ये व्यस्त असतात. याबाबत ग्रामपंचायतीकडे पालकांच्या तक्रारी आहेत. शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्याला घडविण्याचे काम करावे.
सतीश धोटे, सुशिक्षित युवा सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते