वैदर्भींना दिलासा : नवतपावर वादळी पावसाचे सावट; उत्तरार्धात तीव्र चटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature
वैदर्भींना दिलासा : नवतपावर वादळी पावसाचे सावट; उत्तरार्धात तीव्र चटके

वैदर्भींना दिलासा : नवतपावर वादळी पावसाचे सावट; उत्तरार्धात तीव्र चटके

नागपूर - विक्रमी ऊन व सर्वाधिक चटके देणारा नवतपा बुधवारपासून (ता. २५) सुरू होत आहे. यंदाच्या नवतपावर सुरवातीला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचे सावट राहणार असून, त्यानंतर तीव्र लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यावेळीदेखील वैदर्भींना चटक्यांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

२५ मे ते २ जून हा नऊ दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो. नवतपामध्ये दिवस मोठा (१३ तासांचा) असतो. सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ व सूर्यकिरणे सरळ पृथ्वीवर पडत असल्याने उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्यामुळे कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत जाते. तसेच सूर्यापासून येणारी ऊर्जा अधिक काळ पृथ्वीवर राहाते.

या गुणवैशिष्ट्यांमुळे नवतपामध्ये पाऱ्याने अनेकवेळा विक्रमी उसळी घेतल्याचे वैदर्भींनी यापूर्वी अनुभवले आहे. यावेळचे चित्र थोडे वेगळे राहणार आहे. कारण प्रादेशिक हवामान विभागाने उद्या, मंगळवारपासून विदर्भात तीन-चार दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिलेला आहे. त्यामुळे नवतपाच्या पूर्वार्धात काही दिवस नागरिकांना उन्हापासून थोडाफार दिलासा मिळू शकतो. मात्र त्यानंतर कडक उन्हाळा तापण्याची दाट शक्यता आहे. या काळात पारा ४५ अंशांपार जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागासह प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मॉन्सूनवर परिणामनवतपामध्ये अवकाळी पाऊस पडल्यास ती मॉन्सूनसाठी चांगली गोष्ट नसते. कारण या काळात प्रचंड गरमी व सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडल्यास समुद्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीकरण होऊन ढग निर्माण होतात. त्यामुळे दमदार मॉन्सून बरसण्याची शक्यता असते. याउलट नवतपादरम्यान समुद्री भागात पाऊस पडत राहिल्यास बाष्पीकरणाची प्रक्रिया थांबून ढग कमी बनते. त्यामुळेच नवतपाच्या काळात प्रखर ऊन तापणे खूप आवश्यक असते. असे असले तरी, भारतीय हवामान विभागाने यंदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा यावेळी मॉन्सूनवर फारसा परिणाम होईल, अशी शक्यता कमी आहे.

नवतपामध्ये अशी घ्या काळजी

नवतपामध्ये तब्येतीवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असल्यामुळे काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे या दिवसांमध्ये सहसा हलका नाश्ता करूनच घराबाहेर पडायला पाहिजे. शिवाय दिवसभर अधूनमधून भरपूर पाणी आणि फळांचा रस, दही, मठ्ठा, जीरा छाछ, जलजीरा, लस्सी व आंब्याचे पन्हे इत्यादींचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच बाहेर फिरताना नेहमी दुपट्टा, टॉवेल, टोपी व गॉगलचा वापर आणि घाम सोकून घेणारे पांढऱ्या, नरम व सैल कपड्यांचा वापर करावा. उल्लेखनीय म्हणजे उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Navtapa Heavy Rain Vidarbha Summer Environment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top