esakal | स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी उमेदवार कुठून आणणार? राष्ट्रवादीसमोर पेच
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी उमेदवार कुठून आणणार? राष्ट्रवादीसमोर पेच

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) महापालिकेची (nagpur municipal corporation election) निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असली तरी दीडशे उमेदवार कुठून आणणार असा प्रश्न नवनियुक्त शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे (ncp nagpur president duneshwar pethe) यांच्यासमोर आहे. याशिवाय ‘एक बूथ अकरा युथ'ची जुळवाजुळव करण्यासाठी खानापूर्तीशिवाय दुसरा पर्याय राष्ट्रवादीजवळ नाही. (ncp not have enough candidate for nagpur municipal corporation election)

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकमेव नगरसेवक आहे. भाजपने आपल्या फायद्यासाठी चार वॉर्डांचा प्रभाग केला. त्यामुळे राष्ट्रवादीची पडझड झाल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे. मागील निवडणुकीत शेवटपर्यंत काँग्रेससोबत समाधानकारक जागेबाबत बोलणी झाली नव्हती. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीला आपले उमेदवार जाहीर करावे लागले. तेसुद्धा पूर्ण प्रभागात मिळू शकले नव्हते. अनेकांचे नावे जाहीर केली. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. काही उमेदवारांची नावे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांच्याही यादीत होती. यापूर्वी काँग्रेससोबत आघाडी असतानाही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आकडा आठच्यावर सरकला नाही. त्यांपैकी काही आता भाजप व काँग्रेसमध्ये स्थिरावले आहेत. काहींचे अस्तित्व संपले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अपवाद वगळता आमदारांची संख्यासुद्धा इतक्या वर्षांत वाढलेली नाही. त्यामुळे स्वबळावर उमेदवार निवडण्यासाठी अध्यक्ष पेठे यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

नेते जास्त कार्यकर्ते कमी -

राष्ट्रवादी नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पेठे यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत याची पुन्हा प्रचिती आली. तब्बल दोन डझन नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांची उपस्थिती मात्र नगण्य होती. अशा परिस्थितीत ‘एक बूथ अकरा युथ'ही घोषणा लोकप्रिय वाटत असली तरी त्याची अंमलबजावणी करण्यास कार्यकर्ते कुठून आणणार असा प्रश्न आहे. शहरात सुमारे १९०० बूथ आहेत. एका बूथवर अकरा जणांची नियुक्ती करायची असल्यास सुमारे २१ हजार कार्यकर्त्यांची आवश्यकता भासणार आहे. एखादवेळी ते कागदोपत्री दाखवलेसुद्धा जातील. मात्र त्याचा पक्षाला काय फायदा होईल हासुद्धा प्रश्नच आहे.

loading image