जरा इकडे पण लक्ष द्या... पोट भरेना अन्‌ साहेब उभा राहू देईना

No work for city workers
No work for city workers

नागपूर : घरात माणसं जास्ती... मायी बायको अन्‌ मी दोघंबी मजुरीच करतो जी... ह्या कोरोनामुडं सगडे काम बंद झाले... इकडं अड्ड्यावर आलं की काम मिडायचं... पण आता हाताला कामंच नाई जी... त्यातही पोलिस लोकं येते अन्‌ दांडू मारते... मंग, कुठंतरी कोपऱ्यात उभं राहून कोणी मालक लोक कामाला नेते का, याची दुपारपर्यंत वाट बघत बसतो... या भावना आहेत पोट भरण्यासाठी नागपूरमध्ये राहत असलेले साहेबराव वाघमारे यांच्या... 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. राज्यभर संचारबंदी असल्यामुळे शहरातील अडड्यांवर पोलिसांकडून मजुरांना घोळक्‍याने उभे राहू दिले जात नाही. एखादा ठेकेदार कामासाठी माणसं घेण्यास अड्ड्यावर आल्यानंतर त्याच्याभोवती मजूर लगेच घोळका करून काम द्या म्हणून विनवणी करतात. पण, चौकातचं असलेले पोलिस लगेच येऊन घोळका करू नका म्हणून हाकलून लावतात. 

आज देखील शहरातील काही ठिकाणी सकाळपासूनच दोन चार मजूर काम मिळत का याची टेहळणी करीत शहरात दबकत फिरत आहेत. मात्र, लोक जमा झाले की, पोलिस येऊन लगेच हाकलून लावतात. त्यासंदर्भात देवळी येथून आलेले शरद दायतोंडे सांगत होते की, कोरोनामुळे कामाची लिंक तुटली. संपूर्ण बांधकाम साइट बंद झाल्या आहेत. मटेरियलही येत नाही. मला तीन-चार आठवड्यापासून कामच मिळालेलं नाही. त्यात कोरोनाची धास्ती, त्यात ह्या पोलिसांचीदेखील धास्ती आम्हाला बसली आहे. 

हमाली, सेंट्रिंग मिळेल ते काम 
नेहमी मजूर अड्ड्यावर मला काम मिळत होतं. हमाली, सेंट्रिंग मिळेल ते काम करतो. एरवी सहाशे रुपये हजेरी मिळते; पण आता कोरोनामुळे तेही काम मिळत नाही. 
- दत्ता चित्रंग, 
वाराजहागीर, ता. जि. वाशीम

निम्म्याहून अधिक मजुरांची घरवापसी

कोरोनामुळे शहरामध्ये सक्‍तीने बंद पाळला जात आहे. अशातच कामांची संख्या कमी झाल्याने मजुरांना मागणी घटली आहे. त्याचा परिणाम म्हणजे अर्ध्याहून अधिक मजुरांची लॉकडाऊनपूर्वीच घरवापसी झाली आहे. आता मजुरांच्या रोजगाराचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com