esakal | निधी आटला, विकास खुंटला; अमरावती जिल्ह्यातील विकासात्मक कामांना लागला ब्रेक

बोलून बातमी शोधा

null
निधी आटला, विकास खुंटला; अमरावती जिल्ह्यातील विकासात्मक कामांना लागला ब्रेक
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती ः "निधी आटला, विकास खुंटला' असे म्हणण्याची वेळ आता जिल्ह्यातील नागरिकांवर आलेली आहे. सध्या सुरू असलेल्या अनेक विकासात्मक कामांना निधीअभावी ब्रेक लागला असून अनेक कामे आता अपूर्णावस्थेतच राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा: मेडीकलचे वॉचमन रुग्णांना करतात दमदाटी; कोरोनाग्रस्तांच्या भावनांशी खेळ

जिल्ह्यात मंजूर असलेले प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते असो किंवा शहराचे वैभव असलेल्या सायन्सकोरच्या सोंदर्यीकरणाचा मुद्दा असो, हे सारे काही आता ब्रेक झाले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये मागील काही दिवसांपासून कामे सुरू आहेत, अनेक ठिकाणी तर अर्धे रस्तेसुद्धा तयार झालेले नसताना अचानक निधी संपला आणि कामे थांबवावी लागली आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. खान यांनीच ही माहिती जिल्हापरिषदेला दिलेली आहे. दहिगाव ते पापळ रस्ता असो की दर्यापूर तालुक्‍यातील रस्ता असो, पुढील कामांसाठी निधीची अडचण अधिकारी बोलून दाखवीत आहेत. अशीच स्थिती शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायन्सकोर मैदानाची झालेली आहे.

आतापर्यंत केवळ दुर्लक्षित म्हणून परिचित सायन्सकोरच्या मैदानाची डागडुजी तसेच सौंदर्यीकरणाची कामे जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली, यासाठी एक कोटीचा निधीसुद्धा देण्यात आला. मात्र सद्यःस्थितीत मैदानावरील ट्रॅक अपूर्ण असून रुक्‍मिणीनगर भागाकडील संरक्षकभिंतसुद्धा बांधली गेली नाही, निधीच संपल्याने कामे अर्धवट राहिल्याचे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आणि सारेच आश्‍चर्यचकित झाले. कामासाठी आणखी निधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या परिस्थितीने आता आणखी गंभीर स्वरूप धारण केले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांना याचा फटका बसत असून आतातर विकासकामेही ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. सायन्सकोर मैदानाचे जवळपास 180 मीटरचे काम अद्यापही प्रलंबित आहेत. आता अर्धवट कामे झाल्यानंतर निधी आटल्याने झालेल्या कामांचे काय? असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

अधिकाऱ्यांनी यापूर्वी काहीच कल्पना दिलेली नाही. मंजूर निधीतून कामे पूर्णत्वास जातील, असे नियोजन तयार होते, मात्र झाले उलटेच. आता अर्धवट कामे झाल्याने पुढील कामांसाठी निधीची गरज भासणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

-बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हापरिषद.

संपादन - अथर्व महांकाळ