विद्यार्थ्यांनो आता तुमचा 'फिडबॅक' महत्वाचा; महाविद्यालय आणि विद्यापीठांना मानांकन मिळण्यासाठी आवश्यक 

Now Feedback Of Students are Important for Grade of NAC Nagpur News
Now Feedback Of Students are Important for Grade of NAC Nagpur News

नागपूर : ‘राष्ट्रीय अधिस्वीकृती व मानांकन परिषदे’ने (नॅक) मूल्यांकनाच्या निकषांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे विद्यापीठ वा महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ‘फिडबॅक' महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘फिडबॅक फॉर्म’च्या माध्यमातून प्रश्नावली पाठवत ती भरून मागितली जात आहे. मात्र, हे भरताना सर्व चांगल्या बाबींचा उल्लेख करावा व अर्ज भरण्याआधी आपल्या प्राध्यापकांची चर्चा करावी अशा सूचना दिल्या जात आहेत.

महाविद्यालय आणि विद्यापीठांना ‘मानांकन’ देण्यासाठी पारंपरिक प्रकाराला ‘नॅक’ने बंद करून पारदर्शी प्रक्रिया अवलंबिली आहे. यापुढे ‘वस्तुस्थिती दाखवा गुण मिळवा,’ अशी नवी ऑनलाइन पद्धत राबविण्यात आली आहे. देशभरातील ३५० पेक्षा अधिक विद्यापीठे आणि सात हजारांवर महाविद्यालयांचे ‘नॅक’कडून मूल्यांकन होते. यासाठी नॅक समिती संबंधित संस्थेला भेट देते. 

गुणवत्तेपेक्षा दिखाऊपणा आणि सादरीकरणावर भर देत चांगले मानांकन मिळवण्याची संस्थांमध्ये स्पर्धा असते. यामुळे या मानांकनाबाबत सतत तक्रारी येत असतात. या तक्रारीची दखल घेत मूल्यांकन पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मताला महत्त्व देण्यात आले. त्यामुळे ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जाणाऱ्या नागपूर विद्यापीठाला आता विद्यार्थ्यांना ‘फिडबॅक फॉर्म’ भरून घेणे बंधनकारक राहणार आहे. 

यात एक हजार विद्यार्थ्यांपैकी किमान ३५० विद्यार्थ्यांचे अर्ज येणे बंधनकारक राहणार आहे. या अर्जांमध्ये विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेविषयी मांडलेल्या मतांना मानांकन देताना महत्त्वाचे स्थान राहणार आहे. नागपूर विद्यापीठ एक हजार विद्यार्थ्यांकडून ई-मेलच्या माध्यमातून अर्ज भरून घेत आहे. मात्र, हे करताना विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे काय द्यावी, याच्या सूचना प्राध्यापकांकडून दिल्या जात आहेत. 

प्राध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्यांकडून योग्य पद्धतीने अर्ज भरून घ्याव्या अशा सूचना प्राध्यापकांनाही दिल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून हे अर्ज भरून झाल्यावर या ई-मेलला ‘नॅक’कडे पाठविले जाणार आहे. नागपूर विद्यापीठाने नुकताच आपला ‘सेल्फ स्टडी रिपोर्ट’ नॅकला पाठविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com