esakal | कोरोनाच्या विळख्यात अडकल्या कागदी पिशव्या, मागणीत ४० टक्के घट
sakal

बोलून बातमी शोधा

paper bag

कोरोनाच्या विळख्यात अडकल्या कागदी पिशव्या, मागणीत ४० टक्के घट

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : प्लास्टिकच्या पिश‌व्यांना बंदी घातल्यानंतर दुकानदार, हॉटेलचालक आणि कॅटरर्सकडून कागदी पिशव्यांची मागणी वाढली होती. टाळेबंदी (lockdown) लागताच मागणी कमी झाल्याने कागदी पिशव्या (paper carry bags) तयार करणारे व्यवसाय ठप्प झाले होते. बाजारपेठा सध्या चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी ग्राहकांची वर्दळ मंदावल्याने कागदी पिशव्यांची मागणी ४० टक्क्यांनी कमी झालेली आहे. (paper carry bags demand decrease due to corona in nagpur)

हेही वाचा: लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

रंगीत कागद, खाकी कागदांचे, वर्तमानपत्रांच्या रद्दीचे दर अचानक वाढल्यामुळे कागदी पिशव्यांच्या भावात विक्रमी वाढ झालेली आहे. त्यात मागणीही कमी असल्याने १२ ते १५ हजार कामगारांचा रोजगारही गेला आहे. बचतगटांना या पिशव्या बनविणे अवघड झाले आहे. पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली. दैनंदिन वापरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी झाला होता. त्यामुळे कागदी पिशव्यांची मागणी अचानक वाढली होती. परिणामी, नव्या उद्योगातील संधी लक्षात घेता अनेकांनी या व्यवसायात प्रवेश केला. शहरात एक हजारपेक्षा लहान मोठे कागदाचा पिशव्या तयार करणारे कारखाने आणि गृह उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल दरवर्षी होत होती. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून काही उद्योगही बंद झाले आहेत. दुकानांची वेळही सध्या कमी केली आहे. त्याचा फटका व्यापाराला बसल्याने कागदी पिशव्यांची मागणी ४० ते ४५ टक्के कमी झालेली आहे. कागदी पिशव्यापेक्षा प्लास्टिक पिशव्या स्वस्त मिळतात. त्यामुळे व्यापारी प्लास्टिकच्या पिशव्याला पसंती देतात. त्याचाही फटका कागदी पिशव्यांना बसला आहे.

शहरातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून आमच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या रद्दीच्या बॅग बनवण्यात येते. पण, आता रद्दीची किंमत वाढल्याने बॅंग बनवण्यासाठी अधिक खर्च येतो आहे. त्यामुळे हा कागद घेऊन पिशव्या तयार करणे महागले आहे. मागणीही कमी झालेली आहे, असे मल्हार फाऊंडेशनचे आशिष घरडे यांनी सांगितले.

कागदी पिशव्यांची मागणी कमी असताना आता कागदाचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. वृत्तपत्रांची रद्दी महाग असल्याने त्याच्या पिशव्या बनविणे व्यवहार्य नाही. महाग पिशव्या कोण विकत घेणार?
-चंद्रेश उमाटे, संचालक, अर्णपूष्प सेफ्टी बॅग लिमिटेड.
loading image