
नागपूर : हक्काच्या क्रीडा गुणांपासून खेळाडू राहणार वंचित!
नागपूर - वर्षभर प्रॅक्टिस व स्पर्धांमध्ये व्यस्त राहात असल्यामुळे अनेक विद्यार्थी खेळाडूंचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनातर्फे त्यांना सवलतीचे क्रीडा गुण दिले जातात. मात्र जिल्हा संघटनांच्या उदासीन धोरणामुळे असंख्य खेळाडूंवर हक्काच्या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी क्रीडा गुण देण्यात येतात. शासननिर्णयानुसार, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम तीन स्थानांवरील खेळाडूंना प्रत्येकी २५ गुण, तर सहभागी खेळाडूंना २० गुण मिळतात. तसेच राज्य स्पर्धेतील खेळाडूंना अनुक्रमे २० व १५ गुण दिले जातात. याशिवाय जिल्हा स्पर्धेत सहभागी झालेल्यांनाही प्रत्येकी पाच गुण देण्यात येतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एकही शालेय स्पर्धा झाली नाही. त्यामुळे खेळाडूंचे प्रचंड नुकसान झाले. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने यंदाही खेळाडूंना काही अटींवर सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला होता.
क्रीडा गुणांसाठी २०२१-२२ या सत्रात दहावीची परिक्षा देणाऱ्या खेळाडूंची सातवी व आठवीतील क्रीडा कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. तर बारावीतील खेळाडूंची नववी व दहावीतील क्रीडा कामगिरी बघितली जाणार आहे. मात्र, खेळाडूंना गुणांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा क्रीडा संघटनांना आपापल्या खेळाडूंचा अहवाल (प्रस्ताव) जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे पाठविणे अपेक्षित आहे. निर्धारित तारखेपर्यंत नागपूर जिल्ह्यातील केवळ सहा-सात संघटनांनीच अहवाल पाठविला आहे. यात अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, मुष्टियुद्ध, तलवारबाजी आणि तायक्वांदो या संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे वरील संघटनेशी संलग्न खेळाडूंच यंदा क्रीडा गुणांसाठी पात्र ठरणार आहेत. उर्वरित जिल्हा संघटनांनी अहवालच पाठविले नाहीत. त्यामुळे या संघटनांचे खेळाडू सवलतीच्या क्रीडा गुणांपासून वंचित राहणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा संघटनांना वारंवार आवाहन करण्यात येते. मात्र, त्याउपरही संघटना हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दरवर्षीच नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळते. आतापर्यंत केवळ सहा-सात संघटनांचेच प्रस्ताव आले आहेत.
असे मिळतात गुण
विविध जिल्हा क्रीडा संघटना आपापल्या खेळाडूंच्या स्पर्धेतील कामगिरीचा अहवाल अध्यक्ष किंवा सचिवांच्या स्वाक्षरीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पाठवितात. नंतर हे गुणांचे प्रस्ताव ''डीएसओ''मार्फत विभागीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येतात. त्यानंतर खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळतात. तशी नोंद गुणपत्रिकेत केली जाते.
Web Title: Players Will Be Deprived Right Sports Points
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..