Politics : भाजपच्या आणखी एका आमदाराला मंत्रीपदासाठीचा फेक कॉल आल्याचे उघड; पण...| Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krishna khopde

Politics : भाजपच्या आणखी एका आमदाराला मंत्रीपदासाठीचा फेक कॉल आल्याचे उघड; पण...

नागपूर : आमदार विकास कुंभारे यांना मंत्रिपदासाठी पैशाची मागणी करणाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर आणखी एक ‘सेम टू सेम’ प्रकरण पुढे आले. पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनाही सहा ते सात महिन्यांपूर्वी शर्मा नावाच्या व्यक्तिने फोन करून मंत्रिपदाची ‘ऑफर’ दिली होती. त्यासाठी फोन करणाऱ्याने पैशाची मागणी केल्याचा दावा आमदार खोपडे यांनी केला.

भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना निरजसिंग राठोड यांनी मंत्रिपदाची ऑफर देत पैशाची मागणी केली. आमदारकुंभारे यांना शंका येताच पोलिसांत धाव घेतली अन् राठोडचे पितळ उघडे पडले. असेच प्रकरण आमदार कृष्णा खोपडे यांच्याबाबतही घडल्याचे त्यांनी नमुद केले.

सहा ते सात महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्याचवेळी शर्मा नावाच्या व्यक्तिचा फोन आला. त्याने जे. पी. नड्डा यांचा ‘राईट हॅन्ड’ असल्याची बतावणी केली. नड्डा यांनी माझ्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब केले असून तसे आदेशही झाले असल्याचे शर्मा नावाच्या व्यक्तिने सांगितले. परंतु यासाठी त्याने पैशाची मागणी केल्याचे आमदार खोपडे यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले. परंतु भाजपमध्ये पैसे घेऊन मंत्रीपद मिळत नसल्याची जाणीव असल्याने आमदार खोपडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शर्माच्या फोन कॉलबाबत बोलताना आमदार खोपडे म्हणाले, पहिल्या दिवशी त्याचा कॉल आला. अत्यंत मधुर भाषेत त्याने संवाद साधला. पुढे त्याने मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले असून त्यासाठी पैशाची मागणी केली. परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा कॉल आला. आणखी दोन दिवस त्याचे कॉल आले. एकूण पाच ते सहा वेळा शर्माने कॉल केले, असे आमदार खोपडे यांनी नमुद केले.

आमदार कुंभारे यांनाच दिली माहिती

सहा ते सात महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती त्याचवेळी आमदार विकास कुंभारे यांचा अपवाद वगळता कुणाशीही ‘शेअर’ केली नाही. पक्षात असे काही होत नाही, म्हणून पक्षालाही ही बाब सांगितली नाही, असे खोपडे म्हणाले. आमदार खोपडेंवरील प्रसंगाची आमदार कुंभारे यांना आठवण झाली अन् राठोडला अटक झाली, अशी चर्चा आता रंगली आहे. आमदार खोपडे यांच्यासोबत घडलेल्या घटनेची चौकशीही पोलिस करतील काय, याकडे आता लक्ष लागले आहे.

टॅग्स :BjpNagpur