
Pravin Darekar : सीमावाद अस्मितेचा विषय विरोधकांत श्रेयवादाची लढाई; प्रविण दरेकर
नागपूर : कर्नाटक सीमावाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मात्र त्यावरून विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे, अशा शब्दांत भाजप चे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
विधानपरिषदेत ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला दरेकर यांनी उत्तर दिले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी हे सभागृह सातत्याने एकमताने उभे राहिले आहे. जेव्हा या मुद्यावर चर्चा होते, तेव्हा सभागृहाने राजकीय मतभेद बाजूला ठेवलेच पाहिजेत यावरही त्यांनी भर दिला.
याप्रश्नी हे सरकार ठराव आणण्याच्या तयारीत आहे, मात्र इथे श्रेयवाद घेण्याची घाई झाली आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. सीमाप्रश्नी गेल्या दोन-अडीच वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने मनात आणले असते तर काही करता आले असते हे दिवाकर रावते यांचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचे वक्तव्यही दरेकर यांनी सभागृहात वाचून दाखवले.
सीमाप्रश्नाच्या लढ्यात अग्रभागी असणारे छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांना याबाबत बोलण्याचा अधिकार आहे. मात्र जे कधीही रस्त्यावर उतरले नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेवर संशय उत्पन्न करू नये, अशा शब्दांत दरेकर यांनी नाव न घेता ठाकरे यांच्यावर टीका केली. यापूर्वी कधीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावादात हस्तक्षेप केला नव्हता, तो अमित शहा यांनी आता केला आहे. बोम्मई हे त्यांचेही ऐकणार नसतील तर ते आमच्या पक्षाचे असूनही आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही, असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.