esakal | सुपरच्या किडनी प्रत्यारोपणाला पुन्हा मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

सुपरच्या किडनी प्रत्यारोपणाला पुन्हा मंजुरी

सुपरच्या किडनी प्रत्यारोपणाला पुन्हा मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण केंद्राच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर केला होता. मात्र, आरोग्य विभागाने वर्षभरापासून परवानगी न दिल्याने किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया रखडल्या. अखेर नूतनीकरण करण्यात आल्याने किडनी प्रत्यारोपणाचा तिढा सुटला आणि नेफ्रोलॉजी विभागातील तज्ज्ञ सोडून गेले. काहींना कोविड कामात गुंतविले. यामुळे तज्ज्ञांचा अभावी सध्यातरी परवानगी मिळूनही किडनी प्रत्यारोपणात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुपरच्या किडनी प्रत्यारोपणाच्या परवान्याची मुदत वर्षभरापूर्वी संपली. प्रत्यारोपण थांबल्यामुळे औषधशास्त्र विभागाने सर्व निवासी डॉक्टरांना कोविड सेवेवर लावले. नेफ्रोलॉजी विभागातील काही तज्ज्ञ सोडून गेले. यामुळे या विभागातील सर्वच शस्त्रक्रियांना थांबा लागला आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये किडनी प्रत्यारोपणानंतर प्रत्येकी १२ तासांची सेवा लावत मेडिकलच्या औषधशास्त्र विभागातून दोन निवासी डॉक्टरांची सेवा लावली जात होती. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढले. यामुळे येथील निवासी डॉक्टरांना काढण्यात आले. नेफ्रोलॉजी विभागात कंत्राटीवर असलेले डॉ. किंमतकर यांनी सुपरच्या नोकरीचा राजीनामा दिला. विशेष असे की, नेफ्रोलॉजी विभाग प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे यांनीही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. यामुळे प्रत्यारोपण युनिटला मंजुरी मिळाल्यानतंरही मनुष्यबळाअभावी प्रत्यारोपण कसे होईल? हा सवाल आहे.

युनिट गरिबांसाठी वरदान

खासगी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपणाचा खर्च गरिबांच्या तसेच मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात नाही. शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१६ मध्ये किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू केले. हे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील पहिले केंद्र होते. या केंद्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून पहिले किडनी प्रत्यारोपण झाले. प्रत्यारोपण २०१९ पर्यंत योग्यरीत्या केंद्र सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यात केंद्राची पाच वर्षांची मुदत संपली. प्रत्यारोपण केंद्राला तातडीने कार्यान्वित करण्यासाठी नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली. अखेर परवानगी मिळाली, परंतु मनुष्यबळाचा प्रश्न उभा ठाकला.

‘सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण केंद्राच्या परवन्याचे नुतनीकरण झाले. कोरोनाची स्थिती असल्याने तसेही प्रत्यारोपण थांबले होते. आता कोरोना नियंत्रणात आहे. त्यात केंद्राला परवानगी मिळाली. यामुळे लवकरच किडनी प्रत्यारोपण सुरू होईल. मनुष्यबळ उलब्ध करून देण्यात येणार आहे.

- डॉ. सुधीर गुप्ता,अधिष्ठाता, मेडिकल रुग्णालय, नागपूर.

loading image
go to top