
उद्योजकांचा ताळेबंद बिघडणार; लोखंडाच्या दरवाढीने उद्योजकांची चिंता वाढली
नागपूर : कोरोना काळापासूनच लोखंडाचे दर सतत वाढत होते आता युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे स्थिती अधिक गंभीर झालेली आहे. त्यामुळे लोखडांच्या कच्चा मालाच्या पुरवठ्याची साखळी तुटली असून लोखंडाच्या दरात प्रति टन चार हजार रुपयांची वाढ झाल्याने उद्योजक आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. उद्योजकांना मार्च महिन्यापर्यंत कंपन्यांसोबत केलेले करार पूर्ण करण्यासाठी मालाची पूर्तता करावी लागणार आहे. वाढलेल्या दरात लोखंड खरेदी केल्यास उलाढाल वाढलेली दिसत असताना नफ्यात घट होणार आहे. त्यामुळे बॅंकांकडून उद्योजकांसमोर तांत्रिक अडचणी उभ्या केल्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्ध आणि संघर्षाचा विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम होतो आहे. यात प्रामुख्याने गृहनिर्माण उद्योगाचाही समावेश आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी लागणारे लोखंड मोठ्या प्रमाणावर महागले आहे.
आठ ते दहा दिवसांमध्ये सळ्यांस सर्वच प्रकारच्या लोखंडाचे भाव हे प्रतिटन चार हजार रुपयांनी वाढले आहेत. युद्धामुळे त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या वार्षिक ताळेबदांमध्ये आर्थिक उलाढाल वाढलेली दिसणार आहे. मात्र, नफ्याचे प्रमाण कमी होणार असल्याने बॅंकांकडून कर्जाची मागणी केल्यानंतर हा तांत्रिक मुद्दा त्यांच्याकडून उपस्थित केल्या जाण्याची शक्यता आहे. परिणामी, कर्ज मिळण्यासाठीही काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाठीमागील आठ, दहा दिवसांपूर्वी याच सळ्यांचे भाव हे प्रति टन ५५ हजार रुपये इतका होता. मात्र, युरोप आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तो दर ६० हजार रुपयांवर पोहोचला आहे. उद्योगांसाठी लागणाऱ्या लोखंडाचे दर ६४ हजारांवरून ७२ हजार रुपये झालेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग क्षेत्रात या दोन्ही राष्ट्रांचा मोठा प्रभाव आहे. हे दोन्ही देश जगभरातील मोठे लोह खनिज आणि मॅग्नीज पुरवठादार आहेत. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लोखंडी सळी उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बिलेंटचा पुरवठा केला जातो. तसेच, या उद्योगासाठी लागणारा विशिष्ट प्रकारचा कोळसा इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामधून पुरवला जातो. त्यामुळे युद्धाचा परिणाम होऊन हा पुरवठा जगभरात विस्कळित होऊ शकतो.
''कोरोनाच्या प्रादुर्भावातून उसंत मिळत असताना युद्धाचे ढग गडद झालेले आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसात लोखंडाच्या दरात प्रति टन चार हजार रुपयांची वाढ झालेली आहे. यामुळे आमच्या कंपन्यांची उलाढाल वाढणार आहे. खर्चही वाढणार असून नफा कमी होणार आहे.''
-नितीन लोणकर, माजी अध्यक्ष बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.