esakal | सिवेज लाईन तुंबल्या, चेंबर फुटले; मैला रस्त्यावर आल्याने दुर्गंधी
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

सिवेज लाईन तुंबल्या, चेंबर फुटले; मैला रस्त्यावर आल्याने दुर्गंधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शहरातील सिवेज लाईन ओव्हर फ्लो (sewage line overflow nagpur) झाल्या होत्या. पावसाच्या पाण्यासोबतच प्लास्टिक व इतर कचराही सिवेज लाईनमध्ये अडकला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील सिवेज लाईन अद्यापही तुंबलेल्याच असून चेंबरमधून घाणी, सांडपाणीही रस्त्यावर आले आहे. परिणामी नागरिकांचे रस्त्याने चालणेही कठीण झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. (sewage line overflow in nagpur)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

धरमपेठ झोनमधील रामदासपेठ अत्यंत पॉश भाग असून सेंट्रल बाजार रोड वर्दळीचा रस्ता आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये, बॅंक व विविध कार्यालये आहेत. एवढेच नव्हे शहरातील नामांकित हॉटेल सेंटर पॉईंटही येथे आहे. हॉटेल सेंटर पॉईंटच्या बाजूच्या रस्त्याच्या वळणावर पंधरा दिवसांपासून सांडपाणी रस्‍त्यावर वाहत आहे. महापालिकेच्या धरमपेठ झोनने येथे चेंबरच्या बाजूला बॅरिकेड्स लावले. परंतु, पंधरा दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर येत असून नागपूरकरांनाच नव्हे तर बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रुग्णालयांमध्ये बाहेरील नागरिक येत असल्याने शहराचीही प्रतिमा मलिन होत आहे. परंतु, अद्यापही महापालिकेने तुंबलेली सिवेज लाईन स्वच्छ न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या भागातील नगरसेवकाचे याकडे लक्ष नसल्याने परिसरातील दुकानदारांनीही रोष व्यक्त केला. सांडपाणी रस्त्यावर प्रवाहित होत असून स्वच्छ नागपूरच्याच चिंधड्या उडविल्या जात असल्याचे चित्र आहे.

अपघाताची टांगती तलवार -

हजारी पहाड परिसरातील शारदा माता चौकात गेल्या महिनाभरापासून रस्त्याचे काम करताना सिवेज लाईन चेंबरचे झाकण तुटले आहे. इतर भागातही चेंबरचे झाकण तुटल्यामुळे नागरिकांचे वाहन चालविणे जोखमीचे झाले आहे. या रस्त्यावरून जाताना नागरिकांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे. या भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नगरसेवकांनाही याबाबत परिसरातील नागरिकांनी कळविले. परंतु अद्यापही चेंबर दुरुस्त न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

रस्त्याचे काम करताना शारदा माता चौकातील चेंबरचे झाकण फुटले. रस्त्याच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणी कायम अपघात होत आहेत. आतापर्यंत अनेकजण या चेंबरजवळून जाताना जखमी झाले. नगरसेवकांना माहिती दिली पण अद्यापही चेंबरवरील झाकण बदलण्यात आले नाही.
- रोहित सोनटक्के, हजारीपहाड.
loading image