Snake Bite : साप चावला बायकोला, अन्‌ विष चढले नवऱ्याला; ‘तो’ म्हणतो मला नाहीच झाला सर्पदंश snake bite wife poison husband treatment life saving nagpur medical hospital | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rukminibai and Puran

Snake Bite : साप चावला बायकोला, अन्‌ विष चढले नवऱ्याला; ‘तो’ म्हणतो मला नाहीच झाला सर्पदंश

नागपूर - पत्नीला साप चावल्याने पतीने तिला मेडिकलमध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच त्यालाही अस्वस्थ वाटू लागले. त्यालाही साप चावल्याचीच लक्षणे दिसली. परंतु साप चावल्याचे त्याने नाकारले. क्षणातच त्याची प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी त्याच्यावरही उपचार सुरू केले. दोघेही ३२ तासांच्या उपचाराने बरे झाले. परंतु प्रकृती सुधारल्यानंतरही ‘तो’ मला साप चावलाच नाही यावर ठाम आहे. यामुळे या प्रकरणात साप चावला बायकोल अन् विष चढले नवऱ्याला असा प्रकार घडल्याचे दिसते. यावर डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले.

कामठी रोडवरील खसाडा नाकाजवळील वीट भट्टीत रुखमिनीबाई (वय ४०) आणि पुरण (वय ४५) मजूर दाम्पत्य कामाला आहेत. ४ जून रोजी उन्हात काम करून थकल्याने दोघेही जवळच असलेल्या झोपडीत आराम करायला गेले. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास पत्नी किंचाळल्याने पुरण दचकून उठला. त्यांच्या पलंगावर साप होता. पत्नीला साप चावल्याचे लक्षात येताच लागलीच त्याने मेडिकल गाठले. झालेली घटना डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी रुखमिनीबाईवर उपचाराला सुरुवात केली.

एकाच पलंगावर दोघेही झोपले असल्याने, डॉक्टरांनी सहज म्हणून तुम्हाला साप चावला नाही का, असे पुरणला विचारले. परंतु त्याने नकार दिला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास पुरणलातही छातीत त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी त्याला तपासून ईसीजी काढून घेतला. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. डॉक्टरांनी पुन्हा त्याला साप चावला का, कुठे सूज आली का, असा प्रश्न केला. परंतु त्याची नकार घंटा सुरूच होती. तरीही डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याला श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला.

व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली तरी त्याची नकारघंटा सुरू होती. त्याची सर्पदंशाची लक्षणे सूचक होती. डॉक्टरांनी वेळ न घालविता अनुभवाच्या बळावर त्याच्यावर उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले. तो धोक्याबाहेर आला. व्हेंटिलटर काढून त्याला सामान्य वॉर्डात दाखल केले.

सध्या पती-पत्नी दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मेडिसिन विभागाचे डॉ. मिलिंद व्यवहारे व डॉ प्रवीण शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आशिष, डॉ. रामकिशन, डॉ. अस्मिता, डॉ. श्रुतिका, डॉ. भाग्यश्री, डॉ. रुषिकेश, डॉ. पंकज आणि डॉ. हरीश यांनी विशेष परिश्रम घेऊन दोघांचेही जीव वाचविले. धक्कादायक म्हणजे, पती मृत्यूचा दारातून बाहेर आला तरी तो साप चावल्याचा घटनेला नाकारतच असल्याने डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करीत आहे.