
SSC Result 2023 : बस चालकांच्या मुलांनी फिरविले यशाचे ‘स्टेअरिंग’
नागपूर : करिअरच्या दृष्टीने दहावीचे वर्ष टर्निंग पॉईन्ट ठरते. यात यश मिळाल्यावर करिअरची दिशा घडते. मात्र, आजचे शिक्षण पैसेवाल्यांचेच त्यामुळे महागडी शिकवणी आणि उच्चभ्रू शाळेत शिकणे हे गरिबांच्या मुलांसाठी दिवास्वप्नच. अशावेळी परिस्थितीवर मात करीत, ड्रायव्हरच्या मुलांनी दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवित यशाचे ‘स्टेअरिंग’ फिरविले आहे.
ओम राजेंद्र उगले हा केशवनगर शाळेतील असाच एक विद्यार्थी. वडील राजेंद्र उगले यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम म्हणून त्यांनी परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्कुलबस चालविण्याचा निर्णय घेतला.
बस चालकांच्या मुलांनी फिरविले यशाचे ‘स्टेअरिंग’
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्यावर राजेंद्र उगले घरीच होते. त्यात केवळ अर्ध्या वेतनावर त्यांनी काम केले. त्यातून कसातरी संसार सांभाळला. त्यात मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि घर सांभाळणे कठीण झाले. मात्र, मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी काटकसर केली. शाळेचे मार्गदर्शन आणि शिकवणीतून ओमने आपल्या वडिलांच्या परिश्रमाचे चिज करीत दहावीत ९०.६० टक्क्यांसह प्राविण्यश्रेणी गाठली. आता ओमला अभियंता व्हायचे असल्याने तो ‘जेईई’ ची तयारी करीत आहे.
प्रयुक्ती पंचभाई हिचीही कहाणी जवळपास अशीच. आदर्श विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या प्रयुक्तीच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. वडील पदमसेन पंचभाई हे आपली बसमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. अत्यल्प पगारात कंत्राटी तत्वावर ते नोकरी करून कसातरी आपल्या संसाराचा गाढा ओढतात. त्यात मुलींच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याने त्यांनी शाळेतून नाव काढण्याचे ठरविले.
मात्र, अत्यंत हुशार असलेल्या विद्यार्थिनीला शाळेत नियमित ठेवण्यासाठी शिक्षिका सुनिता उपाध्याय यांनी पुढाकार घेतला. तिच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार त्यांनी पाचवीपासून उचलला. त्यातून दहावीच्या परीक्षेत कुठलीही शिकवणी न लावता, प्रयुक्तीने ९७.२० टक्के गुण मिळविले. तिच्या यशाने आई-वडीलच नाही तर शिक्षकांच्या परिश्रमाचे सोने केले. प्रयुक्तीला आता सिव्हील सर्व्हीससाठी अभ्यास करायचा असून त्यावर ती फोकस करणार आहे.
डॉक्टर व्हायचे आहे : श्रुती चिडे
वडील वाहनचालक, त्यांच्या तुटपुंजा पगारात भागत नसल्याने घरात आर्थिक चणचण, दोन वेळ खायला मिळेल की नाही, हे दररोजचे कोडे ? असे असताना मनात शिक्षणाची जिद्द आणि चिकाटीने श्रुती चिडे या विद्यार्थीनीने ९५ टक्के गुण मिळवित यश प्राप्त केले. तिला पाली विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे.
जाई-बाई चौधरी शाळेतून शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मिळालेल्या यशामुळे भविष्यात तिला डॉक्टर व्हायचे आहे. लहानपणापासून गरीब परिस्थितीत राहिलेल्या श्रुतीला घरची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे. अभ्यासासोबत शायरी, कविता देखील लिहिण्याची आवड श्रुतीला आहे. मनात जिद्द असली तर काहीही शक्य असते, अशी प्रतिक्रिया श्रुती हिने दिली.