esakal | एसटीने थांबविली सामान्य प्रवाशांची वाहतूक, फक्त 'या' व्यक्ती करू शकणार प्रवास

बोलून बातमी शोधा

ST
एसटीने थांबविली सामान्य प्रवाशांची वाहतूक, फक्त 'या' व्यक्ती करू शकणार प्रवास
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ब्रेक दी चेन संकल्पनेअंतर्गत राज्य लॉकडाउन करतानाच शहर व जिल्हाबंदीही लागू करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळानेही सामान्य प्रवाशांची वाहतूक थांबविली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून त्यांच्यासह अपरिहार्य व वैध कारण असल्यास सामान्यांनाही प्रवासाची मुभा दिली जात आहे, पण कारणांची सिद्धता प्रवाशांनाच करायची आहे.

हेही वाचा: सीबीआय छापेमारीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले...

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंधांतर्गत प्रवासी वाहनातून एकूण क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी नेण्याची अट घातली आहे. एसटी महामंडळाकडून या अटीचे तंतोतंत पालन केले जात आहे. त्यासोबतच गुरुवारी रात्रीपासून शहर व जिल्हाबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यानुसार विनाकारण शहर किंवा जिल्ह्याबाहेर जाण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार एसटीनेसुद्धा गुरुवारी रात्रीपासून सामान्य प्रवाशांची वाहतूक थांबविली आहे.

कोरोनाच्या नवीन नियमावलीनुसार, अत्यावश्यक प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवासाची मुभा आहे. रुग्णांना उपचारासाठी जाण्यासाठीही एसटीचा वापर करता येईल, शिवाय अंत्यविधीसारख्या अपरिहार्य कारणासाठीही प्रवास करता येईल. दिव्यांगांना मदतनिसासह प्रवासाची मुभा आहे.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

मुख्यालयाच्या सूचनेनुसार, नागपूर विभागातही एसटीतून प्रवास करणाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. त्यात नाव, पत्ता, कारण, आधार कार्ड, कुठपर्यंत प्रवास याची नोंद केली जाते. प्रवाशांना कारण विचारले जाते. कारणाची खातरजमा केल्यानंतरच प्रवासाची परवानगी मिळते किंवा नाकारली जाते. अपरिहार्य कारणासाठी प्रवास करणाऱ्यांच्या हातावर १४ दिवस गृहविलगीकरणाचा शिक्का लावला जात आहे. १ मे पर्यंत हे कठोर निर्बंध राहणार असल्याचे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बसस्थानकावर शुकशुकाट -

नियम कठोर करण्यात आल्याने ऐरवी गर्दीने फुलणाऱ्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात अत्यावश्याक सेवेतील कर्मचाऱ्यांची काहीशी वर्दळ असते त्यानंतर दिवसभर बसस्थानक ओसाड दिसून येत आहे. अगदी चौकशीसाठीही कुणीही येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.