
Nagpur News : स्वच्छ नागपूरसाठी आता स्त्रीशक्ती पदर खोसून कामाला
नागपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण आणि व्यवस्थापनासंदर्भात महापालिकेने आता महिला बचत गटांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतेच्या कार्यात सहभागी बचत गटांना मनपाद्वारे योग्य मोबदला देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आज नमुद केले. त्यामुळे आता शहर स्वच्छतेसाठी महिलाही सहकार्य करताना दिसून येणार आहे.
महाल येथील नगरभवनात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज शहरातील विविध महिला बचत गटांची क्षमता बांधणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख व उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त गणेश राठोड, सहायक आयुक्त किरण बगडे, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, तेजस्विनी महिला मंचच्या अध्यक्ष व स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर किरण मुंधडा, स्वच्छ असोसिएशनच्या अनुसूया काळे छाबरानी, कोल्हे, प्रमोद खोब्रागडे यांच्यासह २८ समुदाय संघटक, सीआरपी, वस्तीस्तर संघ आणि शहरस्तर संघाचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
घरोघरी करणार जनजागृती
महिला बचत गटांमार्फत प्रत्येक घरातून कचरा विगल करून त्यापासून कम्पोस्ट खत निर्मिती करण्याची संकल्पना जोशी यांनी मांडली. शहरात एकूण २५०० बचत गट असून त्यापैकी किमान २००० बचत गटांनी कचरा विलगीकरणासंदर्भात जनजागृती तथा प्रचार प्रसार करण्याची भूमिका बजावल्यास घनकचरा व्यवस्थापन योग्य होईल. प्लास्टिक, सेनेटेरी नॅपकिन्स, घातक कचरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, असा सहा प्रकारचा कचरा वेगवेगळा संकलित करण्याबाबत या महिला घरोघरी जाऊन मार्गदर्शन करतील.
स्वच्छतादूत संगीता रामटेके सन्मानित
यावेळी स्वच्छतादूत संगीता रामटेके दिल्लीतील स्वच्छोत्सव कार्यक्रमास उपस्थित होत्या. सावित्री बचत गटाच्या संगीता रामटेके या रोज एक टन सुका कचरा गोळा करतात. एवढेच नव्हे महानगरपालिकेमार्फत संचालित कचरा संकलन केंद्रासोबतच स्वतःचे २ कचरा संकलन केंद्र चालवतात. या कार्यासाठी त्यांचा अतिरिक्त आयुक्तांसह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.